हॉकर्स, स्टॉलधारकांना इशारा : स्वत: साहित्य काढून घेण्याची सूचना
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. या पाठोपाठ आता बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डनेही फूटपाथवर अतिक्रमण केलेल्या
हॉकर्स, विक्रेत्यांना इशारा दिला आहे. संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास कॅन्टोन्मेंट प्रशासन स्वत: अतिक्रमण हटवेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिकेकडून दोन दिवसांपूर्वी अनगोळ रोड येथील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. त्यांचे दुकानगाळे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कॅन्टोन्मेंटमध्ये फूटपाथवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. फिरत्या विक्रेत्यांसोबत इतर विक्रेत्यांनीही स्टॉल लावून पदपथ अडविले आहेत. हे कॅन्टोन्मेंटच्या लक्षात येताच त्यांच्याकडून
हॉकर्सना इशारा देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पादचाऱ्यांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक करण्याच्या उद्देशाने पदपथावरील अतिक्रमण हटविले जाणार आहे. यामुळे पदपथावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या सर्व विक्रेत्यांनी तात्काळ आपली दुकाने, तात्पुरते स्टॉल व इतर वस्तू हटवाव्यात. या सूचनेचे पालन न केल्यास
कॅन्टोन्मेंटकडून अतिक्रमण हटविले जाणार आहे. त्यावेळी कोणतेही नुकसान झाल्यास त्याला संबंधित व्यक्ती जबाबदार राहणार असल्याचे कॅन्टोन्मेंटने स्पष्ट केले आहे.
‘तरुण भारत’च्या बातमीने कॅन्टोन्मेंटला जाग
बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केले होते. काही शाळांसह खुल्या जागांवर अतिक्रमण करण्यात आल्याचे अधोरेखित करण्यात आले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट प्रशासन खडबडून जागे झाले असून पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
