Headlines

भारत-अफगाणिस्तान टी२० मालिकेची तारीख अन् ठिकाण ठरलं, इतिहासात पहिल्यांदा असं घडणार, नेमकं काय?


India vs Afghanistan T20 Series 2026: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेचे आयोजन कोण करणार आणि ही मालिका का खास आहे, जाणून घ्या.

india vs afghanistan t20 series in september 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका १३, १५ आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाण्याची माहिती आहे. या मालिकेचं आयोजन अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून केलं जाणार आहे. क्रिकइन्फोने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे आगामी काळातील या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार?

सर्व काही नियोजित वेळापत्रकानुसार पार पडलं तर भारत आणि अफगाणिस्तानमधील ही मालिका क्रिकेटच्या इतिहासातील एका अनोख्या घटनेची साक्षीदार ठरू शकते. कारण भारतीय भूमीवर येऊन अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारताविरुद्धच मालिका आयोजित केली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.

अफगाणिस्तानकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कायमस्वरूपी घरचं मैदान नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे अफगाणिस्तानचा संघ गेल्या काही वर्षांपासून भारतात आपले घरचे सामने खेळत आहे. यापूर्वी ग्रेटर नोएडा, डेहराडून आणि लखनौ या ठिकाणी अफगाणिस्तानने घरच्या मैदानावर सामने खेळले आहेत. मात्र, भारतीय संघाविरुद्ध भारतातच यजमानपद भूषवण्याचा योग यापूर्वी कधीही आला नव्हता. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणारी ही मालिका ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesIND vs PAK : आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे शेड्यूल जाहीर! भारत-पाक महामुकाबला होणार पण एका अटीवर, दोन्ही संघांना जिंकावं लागणार; समीकरण जाणून घ्या

आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी होणार मालिका

दरम्यान, भारतीय संघाच्या आगामी वेळापत्रकावर नजर टाकली तर ऑगस्टमध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना २७ ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी२० मालिकेत मैदानात उतरेल.

विशेष म्हणजे, २४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी ही मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी या मालिकेला वेगळं महत्त्व असणार आहे.

Maharashtra TimesIND vs ZIM : अरे काय रे! भारताने झिम्बाब्वेवर एकहाती विजय मिळवला, पण कॅप्टन सिकंदरने दिलं भलतंच कारण; मॅच झाल्यावर काय म्हणाला?

यापूर्वी भारताने दिला होता मोठा धक्का

भारत आणि अफगाणिस्तानचे संघ यापूर्वी जून महिन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी अफगाणिस्तानने भारताचा दौरा केला होता. भारताने एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा डाव आणि ३०० धावांनी पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारतीय संघाने अफगाणिस्तानला व्हाइटवॉश दिला होता.

त्यामुळे आता टी२० मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या निर्धाराने अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे. भारताविरुद्धच्या मागील मालिकांमधील पराभवाची भरपाई करण्याची संधीही त्यांच्यासमोर असेल.

Maharashtra TimesSachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर

टीम इंडियालाही लय मिळवण्याची संधी

टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाची अलीकडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. भारताने आयर्लंडविरुद्धची टी२० मालिका गमावली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताला ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर वनडे मालिकेतही भारताचा १-२ असा पराभव झाला.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Video : फिफ्टीचं सेलिब्रेशन करताना वैभवनं खास व्यक्तीसाठी केला प्रेमळ इशारा, ड्रेसिंग रूमकडे पाहून नेमकं काय केलं? पाहा व्हिडिओ

मात्र, आता भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाची लय पकडण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच अफगाणिस्तानविरुद्धची टी२० मालिका भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी आत्मविश्वास मिळवण्याची आणि आपली लय पुन्हा मिळवण्याची चांगली संधी देणार आहे. त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा