![]()
आपल्या दमदार अभिनयाने आणि रोखठोक विचारसरणीने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तू अनोखी तरी सोबती’ या मालिकेत नीलांबरी ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हेमांगीने तिच्या बालपणीच्या स्वातंत्र्यदिनाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. याचसोबत, एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिच्या आयुष्यातील ‘स्वातंत्र्या’चा खरा अर्थ काय, याबाबतही तिने मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. बालपणीच्या आठवणी आणि सेटवरील उत्साह शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी सांगताना हेमांगी म्हणाली, “शाळेत असताना स्वातंत्र्यदिनाची तयारी म्हणजे आमच्यासाठी एक वेगळाच उत्साह असायचा. मी ‘स्पोर्ट्स गर्ल’ असल्यामुळे झेंडावंदनाची तयारी, ढोल-ताशे आणि बरोब्बर 52 सेकंदांत ‘राष्ट्रगीत’ म्हणण्याची प्रॅक्टिस, या सगळ्याची आम्ही खूप मनापासून तयारी करायचो. आदल्या रात्री पांढऱ्या गणवेशाला इस्त्री करून ठेवण्यापासून ते दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतर कॉलनी किंवा बिल्डिंगमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापर्यंतच्या सगळ्या आठवणी आजही ताज्या आहेत.” ती पुढे म्हणाली, “आता मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरही सेटवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची संधी मिळते. जेव्हा संपूर्ण युनिट एकत्र येऊन ‘राष्ट्रगीत’ म्हणतं, तेव्हा मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राण दिले आहेत, याची जाणीव आपल्याला एरवीही असतेच, मात्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ती जाणीव अधिक तीव्र होते. भारतात जन्माला आल्याचा आणि आपण एक भारतीय आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे.” माझ्या बाबांनी माझ्यावर कधीच बंधनं लादली नाहीत हेमांगीसाठी ‘स्वातंत्र्य’ हे केवळ देशापुरते मर्यादित नाही, तर ते तिच्या वैयक्तिक आयुष्याशीही घट्ट जोडलेले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, “माझ्या बाबांनी आणि ताईने मला नेहमीच स्वतःची स्वप्नं पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य दिलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले असूनही बाबांनी माझ्यावर कधीच कोणतीही बंधनं लादली नाहीत. कपड्यांच्या निवडीपासून ते करिअरपर्यंत, त्यांनी माझ्या प्रत्येक निर्णयाला खंबीर पाठिंबा दिला.” स्वतःच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना हेमांगीने आवर्जून सांगितले की, “मला आधी आर्टिस्ट आणि नंतर ॲक्टर व्हायचं होतं. कामानिमित्त रात्री उशिरा, अगदी 1 वाजता घरी परतायचे, तेव्हाही बाबांनी मला कधीच थांबवलं नाही किंवा प्रश्न विचारले नाहीत. आजही मला वाटतं की, प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं हेच स्वातंत्र्य मिळायला हवं.” मी स्वतःला खूप भाग्यवान समजते स्त्री म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत हेमांगीने कृतज्ञता व्यक्त केली. “विशेषतः एक स्त्री म्हणून मला माझं मत मांडण्याचं, मोकळेपणाने व्यक्त होण्याचं आणि स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, याचं मला खूप महत्त्व वाटतं. लग्नानंतरही माझ्या नवऱ्याने मला तितकाच खंबीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच आयुष्यात स्वतःच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते,” अशा शब्दांत हेमांगी कवी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. हेही वाचा… रायगडच्या आरव्ही बीचवर थरार!:पुण्याच्या पर्यटकांची कार समुद्रात अडकली; जेसीबीने काढले बाहेर, सुदैवाने चौघेही सुखरूप पर्यटनाचा आनंद घेताना अनेकदा पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते आणि हाच अतिउत्साह कसा अंगलट येऊ शकतो, याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आला आहे. पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार चक्क समुद्राच्या लाटांमध्ये अडकून वाहून गेल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धनमधील आरव्ही बीचवर घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, गाडीतील चारही पर्यटक सुखरूप बचावले आहेत. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी जारी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बाबांनी माझ्या स्वप्नांना कधीच बंधन घातलं नाही:अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितला 'स्वातंत्र्या'चा वैयक्तिक अर्थ आणि बालपणीच्या आठवणी
