वृत्तसंस्था, सेंट लुईस
अमेरिकेतील सेंट लुईस येथे सुरू झालेल्या ग्रँड चेस टूरमधील उपांत्य स्पर्धा असलेल्या सिंकफील्ड कपच्या पहिल्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने अमेरिकेचा खेळाडू सॅम्युअल सेवियनविरुद्ध सहजपणे सामना बरोबरीत सोडवला. 10 खेळाडू आणि 9 फेऱ्यांच्या या स्पर्धेत अव्वल मानांकित फॅबियानो कारुआनाने हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव करून विजयाने सुरुवात केली आणि सुरुवातीची आघाडी घेतली तर इतर सामने बरोबरीत सुटले.
प्रज्ञानंदची संयमी सुरुवात
विश्वविजेतेपदाचा दावेदार असलेल्या उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने आर्मेनियातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या लेव्हॉन अरोनियनसोबत गुण विभागून घेतले तर जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला अमेरिकेच्या वेस्ली सोवर मात करता आली नाही. हॉलंडच्या अनिश गिरीचा सामनाही फ्रान्सच्या मॅक्सिम वॉशिएर लाग्रोव्हसोबत बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदसाठी ही एक चांगली सुरुवात ठरली. पाळ्या मोहऱ्यांनी खेळताना त्याने सेवियनला कोणतीही संधी दिली नाही. रुई लोपेझमधील आर्खेन्गेल्स्क व्हेरिएशनमुळे भारतीय खेळाडूला सहज खेळता आले. कारण सेवियनचीही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करण्याची इच्छा नव्हती. तसेच भारतीय खेळाडूची तयारीही अधिक चांगली असल्याचे दिसून आले.
कारुआनाचा विजय
11 व्या चालीपर्यंतच दोन्ही बाजूंचे प्रत्येकी एक हत्ती बदलले गेले आणि खेळाडू वजीर व प्यादी असलेल्या खेळाडूंकडे प्रत्येकी दोन उंट असल्याने निकालाचा अंदाज आधीच आला होता आणि एकदा का क्वीन्सचीही अदलाबदल झाली की त्यानंतर अपेक्षित निकालापर्यंत पोहोचणे ही केवळ वेळेची बाब होती. हा सामना 48 चालींपर्यंत चालला. पण तो त्याआधीच बरोबरीत सुटू शकला असता. कारूआनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो आतापर्यंतच्या टूरमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने समान स्थितीतून फॉरेस्टवर मात केली. डच खेळाडूने मिडल गेममध्ये एका चालीची दखल न घेतल्याने एक प्यादे गमावण्याची चूक केली आणि कारुआनाने 55 चालीनंतर त्याचे पूर्ण गुणांमध्ये रुपांतर करण्यात निर्दोष कौशल्य दाखविले.
इतर उल्लेखनीय निकाल
75000 अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत, सिंदारोव्हने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना अरोनियनला कोणतीही संधी दिली नाही. त्याने पांढऱ्या मोहऱ्यांसह क्वीन पॉनची अनियंत्रित रचना निवडली होती. अरोनियनने एक प्यादे गमावल्याने उझबेक खेळाडूच्या आशा वाढल्या. परंतु विरुद्ध रंगाच्या उंटासह झालेला अंतिम डाव सैद्धांतिकदृष्ट्या केवळ बरोबरीचा होता. व्हिन्सेंट केमरची वेल्सी सो विरुद्ध अशीच कहाणी होती आणि काळ्या राजावर हल्ला करण्याचे त्याचे प्रयत्न अगदी सहजपणे हाणून पाडले गेले तर अनिश गिरीला वाशियर-लाग्रेव्हविरुद्ध कोणतीही प्रगती करता आली नाही आणि शेवटच्या क्षणपर्यंत लढल्या गेलेल्या हत्ती आणि प्याद्यांच्या अंतिम डावात त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
निकाल पहिली फेरी : सेfिवयन सॅम्युअल्स-अमेरिका विरुद्ध आर. प्रज्ञानंद-भारत-बरोबरी, जावोखिर सिंदारोव्ह-उझबेक विरुद्ध लेव्हॉन अरोनियन-आर्मेनिया बरोबरीत, व्हिन्सेंट केमर-जर्मनी वि. वेस्ली सो-अमेरिका बरोबरीत, फॅबियानी कारुआना-अमेरिका वि. जॉर्डन व्हॅन फोरेस्ट-नेदरलँड्स पराभूत, अनिश गिरी-नॅदरलँड्स वि. मॅक्सिम वाशियर-लाग्रेव्ह-फ्रान्स बरोबरीत.
