► वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून, दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर 20 जुलै रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवर पेलेट गनच्या कथित वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पेलेट गनने गोळी लागल्याने एक 19 वर्षीय विद्यार्थी प्रचंड वेदनेत असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचेही राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी दिल्लीत तैनात असलेले सुरक्षा दल अंतिमत: तुम्हालाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
साहजिकच गृहमंत्री म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती का? नसेल तर, कोणी दिली? साध्या वेशात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक पोलीस आहेत की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी परवानगी दिली? असे विविध प्रश्न उपस्थित केले.
आंदोलकांचे संरक्षण करणे आणि संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही लोकशाहीसाठी शांततापूर्ण आंदोलने आवश्यक आहेत. आंदोलकांचे संरक्षण करणे आणि संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
या प्रकारची क्रूर हिंसा प्रत्येक नियमाचे उल्लंघन करते आणि त्यामुळे देश संतप्त झाला आहे. देशाचे भविष्य मानले जाणारे तरुण आणि विद्यार्थी उत्तरे आणि जबाबदारीची मागणी करत आहेत, असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.
