Headlines

पुण्यात तीन बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यामुळे ताब्यात:एसबी पुणे आणि लष्करी गुप्तचर विभागाची संयुक्त कारवाई




पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखा (एसबी) पुणे आणि लष्करी गुप्तचर विभागाने (मिलिटरी इंटेलिजन्स) संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले आहे. लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. लष्करी गुप्तचर विभागाने विकसित केलेल्या माहितीनुसार, एसबी पुणे आणि लष्करी गुप्तचर विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहरात अवैधरित्या राहत असलेल्या तिघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये सोनिया अख्तर, मोतियार गाजी आणि सोनिया मोती पान यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर, या तिघांनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून पुण्यात वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या तिघांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याची (हद्दपारीची) कारवाई केली जाईल. या कारवाईनंतर पुणे शहरातील संवेदनशील आणि असुरक्षित भागांमध्ये गुप्तचर यंत्रणा व पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. वैध कागदपत्रांशिवाय शहरात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या बेकायदा नेटवर्कचा माग काढण्यासाठी तपास यंत्रणांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. बँकेचे सील तोडून सदनिकेत प्रवेश; तीन महिलांवर गुन्हा दाखल सारस्वत बँकेच्या ताब्यातील विश्रांतवाडी येथील सदनिकेच्या मागील दरवाजावरील सील आणि कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश करण्यात आला. याप्रकरणी वत्सला उत्तम ओहोळ, पल्लवी उत्तम ओहोळ आणि विद्या उत्तम ओहोळ (रा. हरी प्रसाद सहकारी गृहरचना संस्था, विश्रांतवाडी) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जतिन जगदीश गुजराथी (वय ३७, रा. सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आरोपींनी बँकेने लावलेले कुलूप आणि सील तोडून सदनिकेत प्रवेश केला. पोलिस हवालदार एस माळी तपास करीत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत