Headlines

जालन्यात मानवतेला काळीमा!:बाजारातून बैल घेऊन जात असताना कथित गोरक्षकांनी अडवले, मारहाण करत चालकाच्या तोंडात शेणही कोंबले




जालन्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवडी बाजारातून खरेदी केलेला बैल आपल्या वाहनातून घेऊन जाणाऱ्या एका चालकाला काही जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. या अमानुष प्रकारात संबंधितांनी पीडित चालकाला केवळ जातीवाचक शिवीगाळच केली नाही, तर त्याच्या तोंडात जबरदस्तीने शेणही कोंबले. ही भीषण घटना 23 मे रोजी घडली होती. या घटनेनंतर आरोपींनी स्वतःच या भयंकर कृत्याचा व्हिडीओ काढून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर, अपमानित झालेल्या पीडित चालकाने तत्काळ पोलिसांत धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत, जालन्याच्या तालुका पोलिस ठाण्यात सहा कथित गोरक्षकांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला मारहाण करत तोंडात जबरदस्तीने कोंबले शेण मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी जालना शहरातील कन्हैयानगर टी-पॉईंटजवळ पीडित वाहनचालक परमेश्वर हिवाळे हे मारुती कांबळे यांचा बैल आठवडी बाजारातून घेऊन जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवली. वाहनाची कागदपत्रे आणि पावती तपासण्याच्या बहाण्याने आरोपींनी परमेश्वर यांना गाडीबाहेर खेचून बेदम मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली. या अमानुषतेची परिसीमा गाठत आरोपींनी त्यांच्या तोंडात जबरदस्तीने शेण कोंबले आणि त्यांच्या मुलालाही मारण्याची धमकी दिली. तसेच या संपूर्ण विकृत कृत्याचा व्हिडीओ स्वतः चित्रीत करून तो निर्लज्जपणे इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओ आणि पोलिसांत तक्रार इन्स्टाग्रामवर हा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, परमेश्वर हिवाळे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगणाऱ्या व्यंकटेश भगत, अर्जुनसिंह, रितेश देशमुख, शिवराम पिछाडे, एसरकटे आणि सोमेश पाटील या सहा जणांनी हे कृत्य केल्याचा स्पष्ट आरोप पीडिताने आपल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी मला न्याय द्यावा, पीडिताची मागणी या संपूर्ण प्रकाराबाबत उद्विग्नता व्यक्त करताना, “माझ्या तोंडात शेण घालतानाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने माझी मोठी बदनामी झाली आहे. पोलिसांनी मला न्याय द्यावा,” अशी मागणी पीडित परमेश्वर हिवाळे यांनी केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत जालन्याच्या तालुका पोलिसांनी या 6 आरोपींविरोधात मारहाण आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत