![]()
पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावरील एक अनुपम भक्ती चळवळ आहे. संतांनी सुरू ठेवलेला हा पायी वारीचा दैदिप्यमान वारसा आजही वारकरी बांधव तितक्याच श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने जपत आहेत. वार
.
या पवित्र वारीमध्ये धर्म, जात, लिंग, उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब अशा सर्वच भेदांच्या भिंती गळून पडतात. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेले लाखो भाविक कोणत्याही अपेक्षेशिवाय, केवळ निष्काम भावनेने यात सहभागी होतात. वारीचे हेच महात्म्य खरोखरच अद्वितीय आहे. देहभान विसरून पायी वारी करणाऱ्या या माऊलींची सेवा करण्यासाठी अनेक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सेवाभावी व्यक्ती आनंदाने पुढे येतात. वैद्यकीय मदत, औषधोपचार, चहा-नाश्ता, शरबत, भोजन आणि निवासाची सोय करून वारीत आपले मोलाचे योगदान देतात. वारकऱ्यांच्या सेवेतच विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडते, याच उदात्त भक्तिभावाने प्रेरित होऊन “आकोट संत नगरी प्रसाद मंडळाने’ गेल्या तीन वर्षांपासून वारकऱ्यांसाठी एक निःस्वार्थी व “पाणीदार’ सेवाकार्य सुरू केले आहे. “मोबाइल श्रद्धामृत पानेरी’चा हा अनोखा उपक्रम सेवा क्षेत्रातील अग्रणी अनिल कोरपे यांच्या खंबीर नेतृत्वात अकोट ते पंढरपूर वारी मार्गावर पायी चालणाऱ्या भक्तांना थंड व शुद्ध आरओचे पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी “श्रद्धामृत फिरती पानेरी’ सेवा सुरू करण्यात आली. कडक रणरणत्या उन्हात पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांची तृष्णा भागवणारा पाण्याच्या गाडीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
६५० किमीचा प्रवास गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन, जवळपास एक महिना आणि ६५० किलोमीटरच्या प्रदीर्घ प्रवासात ही पानेरी अखंड कार्यरत असते. आपल्या स्वतःच्या दिंडीसह मार्गावरील इतर सर्व दिंड्यांमधील भाविकांसाठीही जलसेवा उपयुक्त ठरत आहे. संपूर्ण सेवायज्ञात जळगाव नहाटे येथील गुरुबंधू चंद्रकांत कोल्हे यांचे योगदान संस्मरणीय आहे. तसेच, अकोट संत नगरी सेवा मंडळाच्या शेकडो सदस्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून हा सेवा प्रकल्प अविरतपणे राबवला जात आहे.
