Headlines

दिल्लीचे हरित वळण| Maharashtra Times


दिल्लीचे नवे ई-वाहन धोरण प्रदूषण कमी करण्यासाठी आक्रमक पाऊल मानले जात असून, टप्प्याटप्प्याने पेट्रोल-डिझेल व सीएनजीवरील दुचाकी-रिक्षांऐवजी केवळ ई-वाहनांची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीचे हरित वळण
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जगातील सर्वांत प्रदूषणकारी शहरांमध्ये गणना होणाऱ्या दिल्लीने जाहीर केलेले ‘इलेक्ट्रिकल व्हेइकल’ धोरण, हे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने आक्रमक पाऊल आहे. आजवर प्रोत्साहन व अनुदानापाशीच घुटमळणारी धोरणे फारशी परिणामकारक ठरत नसल्याने आता हे सुविधा आणि सक्ती या सूत्रांवरील सर्वंकष धोरण दिसते. यानुसार नव्या वर्षात पेट्रोल-डिझेल व ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’वरील (सीएनजी) रिक्षा आणि जुलै २०२८पासून दुचाकी बंद होऊन फक्त ई वाहनांचीच दिल्लीत नोंदणी होणार आहे. त्याशिवाय ई वाहनांच्या चार्जिंगसाठी योग्य सुविधांची उभारणी, ई दुचाकींना दहा ते तीस हजार रुपयांचे आणि ई रिक्षांना ३० ते ५० हजार रुपयांचे अनुदान हीसुद्धा नव्या धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. केवळ प्रदूषणावर उपाय नव्हे, तर पारंपरिक इंधनावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचे नव्या विजेवरील वाहनसंस्कृतीमध्ये होणारे हे संक्रमण मानले पाहिजे. दिल्लीतील नव्या धोरणाचे फायदे-तोटे अनुभवास आल्यानंतर संपूर्ण देशातही त्याचीच अंमलबजावणी होऊ शकते. मात्र, घोषणांमधील इच्छाशक्ती प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरेल, तेव्हाच या धोरणांची फलश्रुती दिसून येईल.

देशातील प्रमुख शहरांना प्रदूषणाने विळखा घातला असला, तरी त्यामुळे दिल्लीकरांचा श्वास सर्वाधिक घुसमटतो आहे. वाहनांतून येणाऱ्या धुरातून होणारे प्रदूषण, बांधकामांमधून हवेत मिसळणारी धूळ आणि हरियाणा-उत्तर प्रदेशात जाळला जाणारा शेतीकचरा, ही या प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. त्यामध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा सुमारे ३० टक्के वाटा असल्याचे अभ्यासाअंती आढळते. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर तेथे यापूर्वीच निर्बंध आले; तसेच सम-विषम तारखांना विशिष्ट क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणण्यास निर्बंध आणि ‘बीएस’ मानकांची अंमलबजावणी असे उपाय दिल्लीसह वेगवेगळ्या शहरांत करण्यात आले; मात्र वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाणच अतिप्रचंड असल्याने त्यात हे उपाय वाहून गेल्याचे वस्तुस्थिती सांगते. हवेचे प्रदूषण हे फुप्फुसांचे विकार, कर्करोग, ह्रदयरोग आणि अकाली मृत्यूंचे सर्वांत मोठे कारण ठरते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. बहुसंख्य शहरांतील सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम-२) प्रमाण मानकांच्या दहापट आहे; त्यात २५ टक्के वाटा वाहनांच्या धुराचा आहे. हिवाळ्यांमध्ये या ‘धुरक्या’मुळे ठप्प होणारी वाहतूक आणि कोंडणारे श्वास याचा अनुभव दिल्लीकर घेत आहेत. याच जीवघेण्या संकटातून सुटकेच्या उद्देशाने युरोपने २०३५ पर्यंत या इंधनावरील वाहने हद्दपार करण्याचे धोरण स्वीकारले आहे, तर अमेरिकेत सहा वर्षांत ई वाहनांचे प्रमाण ७०टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. चीनने तर या नवऊर्जा वाहनांमध्ये जगात आघाडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने येत्या वर्षा-दोन वर्षांत केवळ विजेवरील वाहने हेच दिल्लीचे भविष्य असेल, असे ठरवले असून दुचाकी व तीनचाकी वाहने हे त्याचे पहिले लक्ष्य निर्धारित केले आहे. दीड अब्ज लोकसंख्येच्या देशात आजमितीला सुमारे ४० कोटी वाहने असून, वाहनसंख्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सध्या ई-वाहनांची संख्या ८६ लाख, म्हणजे केवळ दोन-अडीच टक्केच आहे. आता नव्या कायद्यानुसार १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल-डिझेलवरील वाहनांची वासलात लावल्यानंतर नवी बॅटरी वाहनेच रस्त्यावर आणण्याच्या योजनेकडे पथदर्शी म्हणून पाहता येईल.

अर्थात, कागदावर आकर्षक भासणारे ई वाहनांचे धोरण प्रत्यक्षात उतरण्यामध्ये अनंत अडचणी उभ्या आहेत. या वाहनांच्या किमती आवाक्यात येण्यासाठी त्यांचा प्रसार आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनवाढ व्हावी लागेल. खासगी व सार्वजनिक चार्जिंग सुविधा, बॅटरी बदलणे (स्वॅपिंग) आणि विक्रीपश्चात दुरुस्तीचे जाळे उभारणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या वाहनांसाठी आवश्यक वीजनिर्मिती. देशात अजूनही ७० टक्के वीजनिर्मिती ही कोळसा जाळूनच होते. त्यामुळे एकीकडे ई वाहनांमधून शहरांतील प्रदूषण घटले, तरी वीजप्रकल्पांतून होणारे कार्बन उत्सर्जन होतेच. त्यामुळे सौरऊर्जेसारखी अपारंपरिक वीजनिर्मिती ही वाढवावी लागेल. दुसरीकडे पारंपरिक इंधनाच्या वाहनांचे उत्पादक आणि त्यावर अवलंबून लाखो लघुउद्योजक-कामगारांचे भवितव्य आणि त्या क्षेत्रातील उलाढालही दुर्लक्षिण्याजोगी नाही. खरे तर वैयक्तिक वाहनांची संख्या आटोक्यात आणून, वाजवी दरात सुलभ आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हा प्रदूषण रोखण्याचा सर्वांत साधा उपाय आहे. त्यामुळे केवळ ई वाहनांसारख्या एखाद्या उपायावर विसंबता अशा प्रश्नांवर सर्वंकष भूमिका घेणे शहाणपणाचे ठरेल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा