मुंबईत आताचा सिंदूर पूल आणि पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिजने भाऊचा धक्का व बंदर परिसराशी मुंबई जोडली. भाऊ ऊर्फ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी उभारलेल्या या बंदर परिसराला भाऊंनी स्वतःच तत्कालीन उगवते गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांचे नाव सुचविले होते.

गजबजलेल्या प्रिन्सेस स्ट्रीटवरून एक झोकदार वळण घेत उजवीकडे उतरल्यावर अरबी समुद्राचे नयनरम्य दर्शन मुंबईत होत असे. आज सागरी मार्गाच्या पोटात शिरण्याची उत्कंठा असली, तरीही मरीन ड्राइव्हचा फ्लायओव्हर आजही प्रत्येकाला खुणावत असतो. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटात अमिताभ बच्चनवर चित्रित केलेल्या गाण्यात या पुलाचे सुंदर दर्शन घडते. मुंबईतील अनेक पूल हे वर्षानुवर्षे असे वेगवेगळ्या रोचक गोष्टींची गाथा बनून राहिले आहेत.
मुंबईत आताचा सिंदूर पूल आणि पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिजने भाऊचा धक्का व बंदर परिसराशी मुंबई जोडली. भाऊ ऊर्फ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी उभारलेल्या या बंदर परिसराला भाऊंनी स्वतःच तत्कालीन उगवते गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांचे नाव सुचविले होते. फ्रेअर, रे रोड, एलफिन्स्टन रोड अशा अनेक गव्हर्नरांच्या नावे मुंबईत पूल उभारले गेले. ऑपेरा हाऊस परिसरात फ्रेन्च व केनेडी या रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावे उभारलेले पूल आजही वापरात आहेत. भायखळ्याचा इंग्रजी एस आकाराचा पूल असेल किंवा १९२६ च्या काळात दादरला उभारलेला टिळक पूल अशा अनेक पुलांनी मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला. पुढे १९७३ च्या सुमारास वाशीमध्ये ठाणे खाडीवर पूल उभा राहिल्याने नवी मुंबई व मुख्य मुंबई बेट यांच्यात दुवा सांधला गेला. शिवडी-न्हावाशेवा किंवा रेवस-करंजा पुलाच्या गोष्टी १९८० च्या दशकापासून ऐकायला मिळायच्या. वांद्रे-वरळी आणि अटल सेतूने खोल समुद्रात अभियांत्रिकी कौशल्याची किमया सिद्ध केली आणि मुंबईला वेगावर स्वार केले. महात्मा फुले मंडई ते हॉस्पिटलपर्यंतच्या उड्डाणपुलाने अत्यंत दाटीवाटीच्या महम्मद अली मार्गावरही पूल उभारला जाऊ शकतो, या जिद्दीचे व जनतेच्या सहिष्णुतेचे दर्शन घडविले. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ५५ पुलांचे शिवधनुष्य रस्ते विकास महामंडळाने पेलले.
पुलांची संख्या वाढू लागली तसे काही जटिल प्रश्नही उभे ठाकले. अंधेरीच्या गोखले पुलाच्या उभारणीत तब्बल साडेसहा फुटांनी अंदाज चुकला. कितीही सारवासारव झाली, तरी भाईंदरचा पूल चार लेनवरून अचानक दोन लेनपुरता निमुळता झाला, हे सत्य कुणीच पचवू शकले नाही. डोंबिवलीतील पलावा पूल उद्घाटनापासून अवघ्या सात दिवसांत दुचाकीस्वारांसाठी कर्दनकाळ ठरला. चिपळूणचा बहादूरशेख नाक्यावरचा पूल उभारणीपूर्वीच कोसळला. बाकी कुठे स्लॅब कोसळणे, खड्डे पडणे, सांधे फाटणे हे प्रकार तर नित्याचेच. कामांमधला विलंब हाही ठरलेला.
या सर्व जटिल समस्यांच्या कारणांवर सर्व यंत्रणा व त्यातील अभियंत्यांनी एकत्रित विचारमंथन गरजेचे ठरते. मुंबई महापालिका, रेल्वे, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम खाते या सर्व यंत्रणा महामुंबईत पूलउभारणीची कामे करतात किंवा प्रत्येक पुलाशी त्यांचा संबंध येतो. पूर्वी त्यांच्या एकत्रित बैठका होत असत. त्यात नागरी तज्ज्ञांचे प्रतिनिधित्वही असे. रेल्वेची वर्दळ तर नेहमीचीच, परंतु पुलाच्या कामासाठी रेल्वे वाहतूक नियमन महिनोन् महिने थांबून राहू शकत नाही. अशा वेळांची जुळवाजुळव महत्त्वाची ठरते. पालिका सभांमध्ये एलवन म्हणजेच सर्वात कमी बोलीच्या निविदेसाठी आग्रह धरायचा आणि निविदा बहाल करताना मात्र कंत्राटदारांच्या खिशात हात घालायचा. अशा दुटप्पी व्यवहारांना सरावलेले कंत्राटदार प्रत्यक्ष कामातील खर्चाला कात्री लावतात. अशा झुंजीत कामे बहाल करताना भरपूर वेळकाढूपणा होतो; परंतु काम सुरू झाल्यावर मात्र उद्घाटनाच्या तारखेनुसार उलटी गणती करून पूल लवकर खुला करण्यासाठी पिच्छा पुरवला जातो. आयटी क्षेत्राची चलती सुरू झाल्यापासून सिव्हिल इंजिनीअरिंगकडे ओढा कमी झाला, त्यामुळे कुशल अभियंत्यांची वानवा असते. पुलांच्या निगराणीची भिस्त केवळ सल्लागारांवर उरते. पूल उभे राहिल्यावर अनेक दोष उघड होतात. पुलावरून वाहने सुसाट जातात; परंतु पूल उतरल्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे वाहतूक व्यवस्थापन केले जात नाही. त्यामुळे पुलांचे लाभ मिळत नाहीत. एकदा का पूल उभे राहिले की त्याखालच्या रस्त्यांना तर कधीच कुणी वाली नसतो. अशा या पुलांच्या अस्वस्थ करणाऱ्या चित्तरकथा…
sameer.karve@timesofindia.com

