Headlines

तिरंगा डौलात, स्कोअरबोर्ड जोमात! टीम इंडियाचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध धुमाकूळ, 4 सुपरस्टार्सचा जलवा, दुसऱ्या दिवसाची रणनीती कशी असणार?


India vs Sri Lanka 1st Test Day 1 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. देवदत्त पडिक्कलचे शतक आणि केएल राहुलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेर मोठी धावसंख्या उभारली आहे.

India vs Sri Lanka 1st Test Day 1
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघाच्या चार सुपरस्टार्सनी शानदार खेळ करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले आहे. या सामन्याचा विचार केल्यास सध्यातरी टीम इंडियाने यावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. पहिल्या दिवशी ७३ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारताने केवळ २ गडी गमावून तब्बल २८८ धावांचा डोंगर उभा केला आहे.

जर संपूर्ण ९० षटकांचा खेळ झाला असता, तर भारतीय संघाने सहज साडेतीनशेचा टप्पा ओलांडला असता, कारण भारतीय फलंदाजांनी जवळपास ४ च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत.

पडिक्कलचे शतक आणि राहुलचे अर्धशतक

या सामन्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल. सराव सामन्यात शतक झळकावणाऱ्या पडिक्कलने तोच फॉर्म कायम राखत श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच पिसं काढली. त्याने १७८ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १३१ धावांची भन्नाट खेळी केली.

Maharashtra TimesInd Vs SL : राहुलचा जोरदार फटका, पुढच्याच क्षणी मैदानात धावपळ; चेंडू थेट हेल्मेटवर आदळला, कोणाला लागला?

त्याला अनुभवी केएल राहुलची उत्तम साथ मिळाली. राहुलने शानदार ७७ धावा केल्या. मात्र, पायाला काहीशी दुखापत जाणवू लागल्याने तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. तो बाद झालेला नसून आवश्यकतेनुसार तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो.

जैस्वाल आणि पंतची आक्रमक साथ

भारताचे जे दोन गडी बाद झाले, त्यात यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वालने नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. मात्र, केएल राहुलसोबत झालेल्या गैरसमजामुळे तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला. तर, शुभमन गिल केवळ १६ धावा करून तंबूत परतला.

Maharashtra TimesDevdutt Padikkal Century : कर हर मैदान फतेह! साई बाहेर, पडिक्कलची एन्ट्री आणि थेट शतक; गॉलमध्ये देवदत्तने संधीचं सोनं करत दोन वर्षांचा दुष्काळ संपवला
दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पडिक्कलसोबत ऋषभ पंत क्रीझवर उपस्थित होता. पंतनेही आपल्या आक्रमक अंदाजाची चुणूक दाखवत अवघ्या ३६ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या आहेत.

दुसऱ्या दिवसाची रणनीती काय असेल?

केवळ ७३ षटकांत २८८ धावा आणि हातात ८ विकेट्स (राहुल धरून) असल्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा प्रयत्न धावफलकावर आणखी किमान ३०० ते ४०० धावा जोडण्याचा असेल. जर भारताने ६०० धावांचा टप्पा ओलांडला, तर ते श्रीलंकेला फलंदाजीसाठी बोलावू शकतात. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात श्रीलंकेला फलंदाजी देऊन त्यांचे २-३ गडी बाद करण्याची टीम इंडियाची रणनीती असू शकते. पहिल्याच दिवशी दिसलेला भारतीय फलंदाजांचा हा रुद्रावतार पाहता, श्रीलंका या सामन्यात एका मोठ्या पराभवाच्या छायेत असल्याचे चित्र दिसत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा