Headlines

तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना पाणी कधी?:अंबादास दानवेंचा सरकारला सवाल; मंत्री उदय सामंत म्हणाले- त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार




छत्रपती संभाजीनगर शहराच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत, “तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना नेमकं पाणी कधी मिळणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पातील त्रुटी मान्य करत स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची आणि प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. दानवे म्हणाले की, एकेकाळी अभिनेता सनी देओल यांच्या चित्रपटातील ‘तारीख पे तारीख’ हा संवाद प्रसिद्ध झाला होता. आज संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचीही तशीच अवस्था झाली आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर आणि अधिकारी वारंवार प्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखा देतात, मात्र शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याचे उत्तर आजही मिळत नाही. 2050 पर्यंतच्या पाणी गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ही महत्त्वाकांक्षी योजना मूळ मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेली नाही. न्यायालय स्वतः या प्रकल्पावर लक्ष ठेवून असतानाही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप दानवे यांनी केला. निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप योजनेच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत दानवे म्हणाले की, निविदेनुसार ज्या दर्जाच्या साहित्याचा वापर होणे अपेक्षित होते, त्याऐवजी काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. फोनेक्स कंपनीचे साहित्य वापरण्याऐवजी इतर साहित्याचा वापर करण्यात आला असून त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात गळती आणि तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराला जवळपास 150 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आल्यानंतरही आता आणखी सुमारे 300 कोटी रुपयांची वाढीव मागणी केली जात आहे. मुदत संपूनही वारंवार मुदतवाढ आणि आर्थिक सवलती दिल्या जात असल्याचा आरोप करत केवळ एखाद्या उपअभियंत्याला निलंबित करून प्रश्न सुटणार नाही. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार या दोघांचीही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दानवे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका, विविध विभाग आणि कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचेही निदर्शनास आणून देत, संभाजीनगरकरांना नियमित पाणीपुरवठा नेमका कधी सुरू होणार, याचे स्पष्ट उत्तर देण्याची मागणी सरकारकडे केली. उदय सामंत म्हणाले- प्रकल्पाची किंमत 667 कोटींवरून 2,740 कोटींवर यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शहराची पाणीपुरवठा योजना 2009 मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत 667 कोटी रुपये होती. मात्र, तांत्रिक बदल आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत वाढून 2,740 कोटी रुपये झाली असून काही कामे अद्याप बाकी आहेत. उच्च न्यायालय या प्रकल्पावर सातत्याने लक्ष ठेवून असून न्यायालयाने यासाठी स्वतंत्र समिती नेमली आहे. दर पंधरा दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार काही ठिकाणी काम योग्य पद्धतीने झाले नसल्याची बाब नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करत उदय सामंत म्हणाले की, निविदेनुसार ज्या कंपनीचे साहित्य वापरणे अपेक्षित होते, त्याऐवजी दुसऱ्या कंपनीचे साहित्य वापरल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येईल. नगरविकास विभागामार्फत स्वतंत्र समिती नेमून संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला जाईल. पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील. संभाजीनगरकरांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी सभागृहात दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत