Headlines

ठाण्यात हळहळ!:बहुजन चळवळीतील युवा नेतृत्व ॲड. नितीन तांबे काळाच्या पडद्याआड, दुचाकीवरून घराकडे जतानाच काळाचा घाला




ठाणे शहरातील बहुजन चळवळीत सक्रिय असलेले आणि ठाणे जिल्हा बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. नितीन श्रीपत तांबे (वय 42) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते महापालिकेतील कामगार नेते श्रीपत तांबे यांचे थोरले सुपुत्र होते. त्यांच्या या अकाली आणि अचानक जाण्याने ठाणे पालिका वर्तुळात तसेच संपूर्ण शहर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नितीन तांबे हे कासार आळी येथे वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी गेले होते. तिथून आपल्या दुचाकीवरून घराकडे परतत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रस्त्यावरच बेशुद्ध होऊन दुचाकीवरून खाली कोसळले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांच्या मदतीला धाव घेत त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नितीन तांबे हे दुचाकीवरून अचानक खाली कोसळल्याचा या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहुजन विद्यार्थी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून नितीन तांबे यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी हिरिरीने सहभाग घेतला होता. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाशी झगडत असत. त्यांच्या या अकाली निधनाने विद्यार्थी चळवळीचा एक खंदा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. यापूर्वीही अनेकदा कधी क्रिकेट खेळताना, तर कधी खुर्चीवर बसल्या बसल्या किंवा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नितीन तांबे यांच्या मृत्यूने या वाढत्या हृदयविकाराच्या घटनांच्या मालिकेत आणखी एका दुःखद घटनेची भर पडली असून, आरोग्याच्या काळजीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत