![]()
शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुकारलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलनावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. खासदार वाकचौरे यांच्या दौऱ्यावेळी प्रत्यक्ष आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार वाकचौरे उपस्थित राहणार होते. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या वाकचौरे यांच्यावर रोष व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आधीच ठाण मांडले होते. वाकचौरे यांच्या आगमनावेळी त्यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करत ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलन करण्याची या कार्यकर्त्यांची तयारी होती. मात्र, या नियोजित आंदोलनाची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. खासदार वाकचौरे हे बैठकीसाठी पोहोचण्यापूर्वीच आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधीच पोलिसांनी कारवाई केली. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख जाधव यांच्यासह तेथे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना नंतर तोफखाना पोलिस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध करण्यात आले. दरम्यान, ठाकरे गटाकडून वाकचौरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Source link
ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात:खासदार वाकचौरेंविरोधातील "ऑपरेशन तुडवा' आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले
