Headlines

टीम इंडियाने आधी धावा कुटल्या, मग 3 ओव्हरमध्येच दोन विकेट्स उडवल्या; कोलंबोत श्रीलंकेची हालत खराब, ड्रेसिंग रुममध्ये राडा


IND vs SL 2nd Test Day 2 : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेरीस टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पडिक्कल, जुरेल आणि पंतच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ५०३ धावा केल्या, तर श्रीलंकेची सुरुवात ८/२ अशी झाली.

IND vs SL 2nd Test
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, त्यांचा पराभव आता जवळपास निश्चित मानला जात आहे. भारताच्या तीन सुपरस्टार खेळाडूंनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. या संभाव्य विजयामुळे भारताचा ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ ( WTC ) फायनलचा रस्ता आणखीच सोपा होणार आहे.

पडिक्कल-जुरेलची शतकं आणि पंतचा दणका

या सामन्यात भारताने पहिल्या डावात ९ बाद ५०३ धावांचा डोंगर उभा करून आपला डाव घोषित केला. यामागे टीम इंडियाच्या तीन प्रमुख शिलेदारांचा सिंहाचा वाटा राहिला. देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत ११७ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तर ध्रुव जुरेल याने सातव्या क्रमांकावर येत ११५ धावांची तुफानी शतकी खेळी साकारली. ऋषभ पंतनेही आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत ६३ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालने ४५ धावा केल्या, तर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनीही छोट्या पण उपयुक्त खेळ्या केल्या. या सर्वांच्या बळावर भारताने ५०० चा टप्पा ओलांडला.

Maharashtra TimesDhruv Jurel Century : ध्रुव जुरेलचं शतक, सेलिब्रेशन थेट वडिलांना समर्पित; कारगिल योद्ध्याच्या मुलाने जिंकली मनं, नेमकं काय केलं?

श्रीलंकेची खराब सुरुवात अन् ड्रेसिंग रूममध्ये राडा

भारताच्या ५०३ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी अवघ्या ८ धावांवर २ ज्यामध्ये लहिरू उदारा आणि प्रभात जयसूर्या यांचे विकेट गमावले आहेत. श्रीलंकेचा संघ अजूनही ४९५ धावांनी पिछाडीवर आहे. खराब प्रकाश असतानाही पंचांनी खेळ सुरू ठेवल्याने श्रीलंकेचे खेळाडू आधीच नाराज होते. याच अंधुक प्रकाशात फिरकी गोलंदाजांचा सामना करताना प्रभात जयसूर्या बाद झाला. बाद झाल्यानंतर त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्याने आपली बॅट, ग्लोज आणि हेल्मेट फेकून दिल्याची धक्कादायक घटनाही पाहायला मिळाली.

Maharashtra TimesUsain Bolt Record : जगातल्या सर्वात वेगवान धावपटूला कोणी दिली मात? बोल्टचा 17 वर्षांचा विक्रम मोडला; 100 मीटरचा नवा बादशाह कोण?

भारताला विजयासाठी आता फक्त १८ विकेट्सची गरज

सध्या श्रीलंकेवर ४९५ धावांचं मोठं दडपण आहे. सामन्याचे अजून ३ दिवस शिल्लक आहेत आणि भारताला विजयासाठी आता फक्त १८ विकेट्सची (पहिल्या डावातील ८ आणि दुसऱ्या डावातील १०) गरज आहे. पावसाने जास्त व्यत्यय आणला नाही, तर तीन दिवसांत १८ विकेट्स घेणं भारतीय गोलंदाजांसाठी फार कठीण काम नाही.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा