![]()
दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. “जंतर-मंतरवर घडलेल्या घटना टाळता आल्या असत्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर वेळेत तोडगा निघाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी “सरकारविरोधात लोकमत तयार करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. घटना वेदनादायी, पण संयमाची गरज दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या आणि राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, “या घटना यातनादायी आहेत. या सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते.” ते पुढे म्हणाले, “मोर्चांमध्ये हजारो लोक असतात. काही उत्साही कार्यकर्ते पोलिसांचा बंदोबस्त तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी पोलिसांना कारवाई करावी लागते. मात्र, कारवाई करतानाही संयम राखण्याची गरज असते.” मोदी आणि अमित शाह तोडगा काढतील या संपूर्ण प्रश्नावर केंद्र सरकार योग्य तो मार्ग काढेल, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. “हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह योग्य पद्धतीने सोडवतील, असा मला विश्वास आहे,” असे ते म्हणाले. सरकारविरोधात वातावरण तयार करणे हे विरोधकांचे काम जंतर-मंतर आंदोलनाचे राजकारण होत असल्याच्या प्रश्नावर भुजबळ यांनी विरोधी पक्षांची भूमिकाही मान्य केली. “सरकारच्या विरोधात संधी मिळाली की त्याचा राजकीय मुद्दा करणे आणि सरकारविरोधात लोकमत निर्माण करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते. त्यामुळे विरोधक त्यांचे काम करत आहेत,” असे त्यांनी सांगितले. सुरुवातीलाच तोडगा निघाला असता तर… पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत भुजबळ म्हणाले, “जेव्हा सोनम वांगचूक आंदोलनाला बसले होते, त्याच वेळी सरकारने तोडगा काढला असता, तर पुढील घटना घडल्या नसत्या. आता जे घडले ते आपल्या सर्वांसमोर आहे. या सगळ्या गोष्टी टाळता आल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते.” अजित पवारांना श्रद्धांजली, फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी छगन भुजबळ यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शेतकरी, विद्यार्थी, महिला, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत, “फडणवीस हे कष्टाळू आणि विकासाभिमुख नेतृत्व आहे,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटित राहिल्याचे सांगत, महिला नेतृत्वाला सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले.
Source link
जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या:छगन भुजबळ म्हणाले- मोदी-शहा तोडगा काढतील, विरोधकांचे काम सरकारविरोधात लोकमत तयार करणे
