सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग मंडळ साहित्य क्षेत्रात उत्तम कार्य करत असून, साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांनी दिलेली भेट आहे, अशा शब्दांत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ऑनलाइन गुरुवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कर्णिक म्हणाले, “गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांच्या शुभेच्छा आहेत. ही शुभेच्छारूपी भेट मला मुंबईत असतानाच मिळाली असून, ती माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. सिंधुदुर्गात साहित्य चळवळ वेगाने पुढे जात आहे. ही चळवळ अधिक प्रगल्भ करण्यासाठी सातत्याने कार्य करा. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवत राहा. तुम्हा सर्वांना माझे मनःपूर्वक आशीर्वाद आहेत.”
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले की, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार काम सुरू आहे. परिषदेला शासन स्तरावरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमराठी बांधवांना मराठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाणे येथे होणार आहे. तसेच लवकरच कोकणात राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त मिळालेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
बैठकीत ‘ग्रंथमित्र पुरस्कार’ विजेते, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा खजिनदार तथा ज्येष्ठ साहित्यप्रेमी आनंद वैद्य आणि जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांचा पाईप क्लिन्झर पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांतिक सदस्य रुजारी ओ. पिंटो, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे, सहसचिव सुरेश पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
