केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ‘जेन झी’ पिढीला सल्ला : ‘लोकमान्य पुरस्कार’ अजित डोवाल यांना प्रदान
त. भा. प्रतिनिधी
पुणे
आजच्या युवकांनी लोकमान्य टिळक यांचा ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ आवर्जून वाचवा. हा ग्रंथ समजून घेतल्यास त्यांच्याकडून कधीही चुका होणार नाहीत, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जेन झी पिढीला शनिवारी दिला.
‘टिळक स्मारक ट्रस्ट’च्यावतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार 2026’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक आणि शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. एक लाख ऊपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, प्रणती टिळक आदी उपस्थित होते.
मंत्री शहा म्हणाले, सांस्कृतिक राष्ट्रवादाला लोकमान्य टिळक यांनी दिशा दिली. आज त्याच दूरदृष्टीमुळे देश सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गाने जात आहे. युवकांनी टिळकांचा ‘गीता रहस्य’ हा मौलिक ग्रंथ जरूर वाचायला हवा. आयुष्यात चुका टाळण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. मला लोकमान्य टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझे तरुणांना आवाहन आहे, ‘तुम्ही टिळकांचे गीतारहस्य वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. याची मी ग्वाही देतो. हा ग्रंथ भगवद्गीतेचं व्यावहारिक रूप आहे. सामान्य माणूस भगवद्गीता कशी जगू शकतो, याचे प्रतिबिंब त्यात आहे.
केसरी आणि मराठा वर्तमानपत्रांना इंग्रज घाबरायचे. त्याचे श्रेय टिळकांच्या सडेतोड लेखनाला जाते. राष्ट्राच्या चेतनेला जागवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत असेल, तर त्याला काही मूल्य नाही. राष्ट्राची चेतना जागवूनच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी टिळकांची भावना होती. त्यांनी अनेक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना संघटीत करण्याचे काम केले. आत्मनिर्भरता, अनुशासन, कर्तव्यभाव हादेखील लोकमान्यांच्या स्वराज्याचा भाग आहे. टिळकांचे जीवन हा प्रेरणास्रोत आहे, अशा शब्दांत शहा यांनी टिळकांच्या कार्याचा गौरव केला.
भारताचे स्थान मजबूत करण्यात डोवाल यांचे योगदान
अजित डोवाल यांना टिळक पुरस्कार दिल्याबद्दल टिळक स्मारक ट्रस्टचे मी मनापासून आभार मानतो. अजित डोवाल यांना पुरस्कार देण्यासाठी मला बोलावले, याचा आनंद आहे. पुरस्कार हा कामाचे कौतुक करण्याची एक पद्धत आहे. कुठलाही पुरस्कार हा प्रेरणादायीच असतो. व्यक्ती मोठी होते, तेव्हा ती व्यक्ती राहत नाही. त्यापुढे जाते. डोवाल यांच्याबाबत तसे म्हणता येईल. डोवाल हे जन्मजात देशभक्त आहेत. देशात राष्ट्रवाद जागवला गेला. भारताने जगात आपले स्थान मजबूत केले. त्यात डोवाल यांचे योगदान मोठे आहे. विदेशनीती, अंतर्गत तसेच बाह्या सुरक्षेकरिता त्यांनी मोठे काम केले आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
डोवाल यांच्यामुळे सामरिक नीती बदलली : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धुरंधराकडून धुरंधराला वा चाणक्मयाकडून चाणक्याला पुरस्कार, असेच याचे वर्णन करावे लागेल. डोवाल यांनी देशाची सामरिक नीती बदलली. मार खाणारा नव्हे; तर घरात घुसून मारणारा देश, अशी देशाची प्रतिमा तयार केली. लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे जनक होते. त्यांनीच राष्ट्रवादाची खऱ्या अर्थाने सुरूवात केली, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, अजित डोवाल सिर्फ नाम ही काफी है. एकीकडे देशद्रोही, नक्षलवादी संपवणारे अमितभाई आहेत, तर दुसरीकडे सुरक्षा सांभाळणारे, रणनीतीकार डोवाल आहेत. अमित शहा यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळणे, हा दुग्धशर्करायोग आहे. मोदीशहा आज एकच नाव झाले आहे. ही जोडी देशाच्या विकासासाठी आपले सर्वस्व देत आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘डोवाल यांनी संपूर्ण जीवन राष्ट्र सेवा व सुरक्षेसाठी समर्पित केले. सक्षम नेतृत्वाकडून त्यांचा यथोचित सन्मान झाला आहे. अजित डोवाल यांच्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे.’
