बेळगाव :
बेळगाव रेल्वे स्थानकातून देशाच्या महत्त्वाच्या शहरांना रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत बेळगाव रेल्वे स्थानकातून 54 लाख 46 हजार 993 प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने नुकत्याच दिलेल्या एका पत्रकातून ही माहिती मिळाली आहे.
बेळगावमधून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपती, म्हैसूर, बेंगळूर, पुणे, तिरुवनवेली, पाँडिचेरी, राजस्थान, हरिद्वार, गोवा यासह इतर शहरांना रेल्वेसेवा उपलब्ध आहे. त्यामुळेच प्रवाशांची संख्या वाढत आहे. मागील दोन वर्षांत नव्या रेल्वे सेवेचा समावेश झाल्याने प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. केवळ बेळगाव रेल्वे स्थानकातूनच 54 लाख प्रवाशांची नोंद झाली असून त्यानंतर घटप्रभा, कुडची या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.
हुबळी-मिरज या मार्गावर दिवसभरात दोन ते तीन पॅसेंजर रेल्वे धावत असतात. या बरोबरच दोन वंदे भारत व इतर लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. बेळगाव रेल्वे स्थानकाला भव्य इमारत तसेच इतर सोयी असल्याने वाहतुकीच्या दृष्टीकोनातून बेळगाव रेल्वे स्थानक महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळेच तिरुपतीला जाण्यासाठी केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, सावंतवाडी व गोव्यातूनही प्रवासी बेळगाव रेल्वे स्थानकाला पसंती देतात.
