► वृत्तसंस्था हैदराबाद
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा ठपका असलेल्या एका आरोपीने शुक्रवारी रात्री जामिनावर सुटल्यानंतर तेलंगणाच्या रंगारेड्डी जिह्यात सहा जणांची हत्या केल्याने राज्य हादरले आहे. त्याने आधी आपल्या 30 वर्षीय पत्नी आणि चार वर्षे व 18 महिन्यांच्या दोन मुलांची हत्या केली.
त्यानंतर त्याने सुमारे सहा किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या गावात जाऊन 17 वर्षीय बलात्कार पीडित मुलगी, तिची आई आणि आजी यांचीही हत्या केली. सदर पीडित मुलीने 16 मे रोजी आरोपी राजकुमारविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेने राज्यात खळबळ निर्माण झाली असून आरोपी राजकुमारचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या एका तरुणाने हे रक्तरंजित हत्याकांड घडवले आहे. आरोपीने एकाच रात्रीत तब्बल सहा जणांची हत्या केली आहे. त्याने पीडित मुलीला देखील गळा चिरून संपवले आहे. या रक्तरंजित थराराने केवळ तेलंगणाच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याने सूड भावनेतून त्याने हे हत्याकांड घडवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात संपूर्ण हत्याकांड सूडाच्या भावनेतून घडल्याचे दिसून येते. पण आरोपीने स्वत:ची पत्नी आणि मुलांचा खून का केला? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
असे घडले हत्याकांड…
आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नी सरिताची, 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. यानंतर तो थेट सुमारे 6 किलोमीटर दूर असलेल्या पीडित मुलीच्या घरी पोहोचला. त्याने धारदार शस्त्राने पीडित मुलगी, तिची आई आणि आजीवर हल्ला करून त्यांची हत्या केली.
मुलीला घराबाहेर नेऊन तिच्यावर पुन्हा लैगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण या दाव्याची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होईल. याच मुलीने 16 मे रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत राजकुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे तो तुरुंगात गेला होता.
वडिलांना फोन करून फरार
सहा जणांच्या हत्याकांडानंतर स्वत:च्या वडिलांना फोन करून सगळी माहिती दिली आणि स्वत: देखील आत्महत्या करणार असल्याचे कळवले. वडिलांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी आणि विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
पीडित मुलीच्या नातेवाईकांचे पोलिसांवर आरोप
या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी धक्कादायक आरोप केले आहेत. आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने अलिकडेच संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याबातही आम्ही पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला चौकशीसाठी किंवा रिमांडसाठी नेण्यात आले नाही, असे म्हणत पीडित मुलीच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
घटनेच्या 20 दिवसांनंतर जामीन मिळाल्यामुळे सदर आरोपी मोकाट फिरत होता.
सूड भावनेतून भयानक कृत्य
अटकेनंतर आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. मात्र जामीन मिळल्यानंतरही आरोपीची पीडिता आणि तिच्या कुटुंबाप्रतीची सूडाची भावना संपली नव्हती. या सूडाच्या भावनेनेच आरोपीने कुटुंबाला लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याची जामिनावर सुटका झाली. त्याने लाच दिली आणि प्रकरण दाबण्यात आले. आता त्याने त्या मुलीची हत्या केली आहे आणि हे सर्व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडले असा आरोपही मुलीच्या मामाने केला आहे.
