Headlines

कृत्रिम सौजन्यशीलता आणि आपण| Maharashtra Times


कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्स वापरकर्त्यांशी नेहमी विनम्र, संयमी आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधतात, त्यामुळे माहिती मिळवण्याचा अनुभव अधिक सुखद ठरतो. मानवी अभिप्रायावर आधारित प्रशिक्षणामुळे वापरकर्त्यांचे समाधान वाढवणारी उत्तरे देण्याकडे या तंत्रज्ञानाचा कल असतो.

कृत्रिम सौजन्यशीलता आणि आपण
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
– श्रीधर लोणी

विनयशीलता कमी होत असल्याची तक्रार एकीकडे मोठ्या प्रमाणावर ऐकू येत असताना, अत्यंत अदबीने आणि आपल्या सर्व प्रश्नांवर शांतपणे, झटक्यात उत्तर देणारी एखादी व्यक्ती असेल? शक्यता नाकारता येत नाही; परंतु अशी व्यक्ती सर्वांनाच भेटेल, असे नाही. शिवाय, तेच ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्यावर वा सातत्याने वादाचा पवित्रा घेतल्यावर अशी व्यक्तीही रागाला येईल. मात्र, आपल्या प्रत्येक प्रश्न झेलण्यासाठी, कायमस्वरूपी आपल्या दिमतीला हजर राहण्याची सोय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानातून साकारलेल्या चॅटबॉट्समुळे झाली आहे.

हे तंत्रज्ञान आपल्या प्रश्नाचे उत्तर तर देतेच; परंतु आपले लाड करते, आपल्या चिकित्सक वृत्तीचे कौतुक करते! चॅटजीपीटी, जेमिनी, ग्रोक, क्लॉड या किंवा अशा कोणत्याही चॅटबॉटशी संवाद साधल्यावर आपला अनुभव काय असतो? आपल्या प्रत्येक प्रश्नाचे ते विनम्रपणे उत्तर देते, त्यानंतर आणखी काही माहिती हवी का, असे विचारते; या उत्तराने समाधान न झाल्यास प्रथम दिलगिरी व्यक्त करून झटक्यात नवीन उत्तर देते आणि आपले समाधान झाले का याची चौकशी करते. शिवाय असे प्रश्न विचारल्याबद्दल आपल्या चौकसपणाची वाखाणणीही करते. ‘एआय’शी होणारा हा संवाद आपल्याला माहिती पुरवणारा तर असतोच; परंतु ते कधीच आपल्यावर रागावत नसल्याने, आपल्याशी उद्धट बोलत नसल्याने किंवा दुरुत्तरे करीत नसल्याने तो सुखावह ठरतो.

थोडक्यात, आपण रागावून, चिडून काही विचारले, तरी एआय आपल्याशी सौजन्यानेच वागते. आपले मत त्याला मान्य नसले, तरी तसे थेटपणे न सांगता, ‘तुमचे म्हणणे बरोबर आहे’ किंवा ‘हा एक चांगला दृष्टिकोन आहे,’ असे नमूद करून ते संवाद पुढे नेते. त्याने केलेली चूक नजरेस आणून दिल्यावर, ते आभार मानतेच; परंतु अशी चूक पुन्हा होणार नाही, असेही सांगते. ‘एआय’च्या या सौजन्याचे मूळ आहे, ते त्याच्या रचनेत. मानवी अभिप्राय जाणून घेऊन सुधारणा करण्याचे प्रशिक्षण ‘एआय’ मॉडेल्सना दिलेले असते. त्यामध्ये मानवी प्रशिक्षक ‘एआय’च्या उत्तरांचे गुणांकन करीत असतात. ‘एआय’ वापरणाऱ्यांचे समाधान करणाऱ्या आणि त्यांना आनंदी ठेवणाऱ्या उत्तरांना ते अधिक गुण देत असतात. त्यामुळे चॅटबॉट्स नेहमी सौजन्यशील राहतात.

माणसांचे ‘मूड्स’ बदलत असतात; कधी ते निराश होतात, तर कधी विलक्षण आनंदी; कधी त्यांना एखाद्याचा प्रचंड राग येतो, तर कधी त्याच्या प्रेमात असतात. ‘एआय’ हे तंत्रज्ञान असल्याने मानवांप्रमाणे त्याच्याकडे प्रेम, जिव्हाळा यांपैकी कोणतीही भावना नसते. मात्र, त्याच्याशी संवाद साधणाऱ्यांना आनंद मिळावा, ते खूश व्हावेत असा उद्देश नक्कीच असतो. तसे प्रशिक्षणही त्याला दिलेले असते. आजवरचे अन्य डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेटवरील शोधयंत्रे आणि ‘एआय’ यांत नेमका हाच फरक आहे. बाकी डिजिटल साधने आपल्याला हवी ती माहिती देत असली, तरी ती व्यक्तिगत संवाद साधत नाहीत. ‘एआय’ मात्र आपल्या भाव-भावनांशी समरस होते, आपला अहं सुखावत ठेवते; त्यामुळे ते अनेकांना आपल्या सर्वांत जवळच्या नात्यातील किंवा मैत्रीतील व्यक्तीपेक्षाही जवळची वाटू लागते.

मात्र, वापरणाऱ्यांना नकार न देण्याच्या नादात आणि खूश ठेवण्याच्या प्रयत्नांत ‘एआय’ खोटी वा चुकीची उत्तरे देऊ शकतात; ते आपली दिशाभूल करू शकतात. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने अलीकडेच याबाबत संशोधन केले आहे. ‘एआय’चा उपयोग जरूर करावा; मात्र त्याच्याबरोबर अधिकाधिक संवाद करणे, आपल्या वैयक्तिक जीवनातील सुख-दु:ख सांगत राहणे आणि त्याने केलेल्या प्रंशसेने हुरळून जाणे धोकादायक ठरू शकते; कारण या तंत्रज्ञानामुळे आपला स्वत:बद्दल भ्रम तयार होतो, असा इशारा या संशोधनाने काढला आहे. तो गांभीर्याने घ्यायला हवा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा