Kalyan-Murbad ST Bus: पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि जास्त आसनक्षमता असणाऱ्या १० नव्या राजमाता जिजाऊ एसटी बस कल्याण-मुरबाड मार्गावर सुरू झाल्या आहेत. रायते पुलावर अपघातानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, ठाणे: कल्याण- मुरबाडदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना एस.टी. महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या नव्या दहा गाड्यांमुळे दिलासा मिळाला आहे. अपुऱ्या आणि अनियमित बस फेऱ्यांमुळे प्रवाशांना जीप, सहा आसनी रिक्षांमध्ये दाटीवाटीने बसून त्यांना प्रवास करावा लागत होता. आता नव्या दहा बस गाड्यांमुळे कल्याण-मुरबाडदरम्यान पहाटे साडेपाच ते रात्री नऊपर्यंत दर पंधरा मिनिटांनी बससेवा उपलब्ध होईल, अशी माहिती एस.टी. व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. १३ एप्रिल रोजी सकाळी कल्याण-मुरबाड दरम्यान रायते पुलावर साडेदहाच्या सुमारास इको टॅक्सी आणि सीमेंट मिक्सरचा भीषण अपघात झाला. त्यात इको वाहनात दाटीवाटीने बसलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने या मार्गावरील
अपुऱ्या वाहतूक सुविधेचा प्रश्न प्रकर्षाने ऐरणीवर आला. मात्र आता दहा नव्या बसगाड्या या मार्गावर उपलब्ध झाल्याने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याने या नव्या गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. रविवारी आमदारांच्या उपस्थितीत या फेऱ्या सुरू करण्यात आल्या.
राजमाता जिजाऊ शटल योजनेतून उपलब्ध झालेल्या या दहा गाड्यांपैकी पाच गाड्या कल्याण-मुरबाड आणि पाच गाड्या मुरबाड-कल्याण अशा मार्गावर चालवल्या जाणार आहेत. कल्याण आणि मुरबाड दोन्ही ठिकाणांहून सकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता पहिली बस सुटेल आणि रात्री नऊ वाजेपर्यंत या बस फेऱ्या सरासरी पंधरा मिनिटांनी उपलब्ध होतील, अशी माहिती मुरबाडचे आगारप्रमुख योगेश मुसळे यांनी दिली.
विद्यार्थी, प्रवासी आंदोलनाची दखल
एप्रिलमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी आणि प्रवाशांनी आंदोलन करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. एस. टी. महामंडळाने जादा फेऱ्या सुरू कराव्यात म्हणून त्यांनी सह्यांची मोहीमही राबवली होती.
मे महिन्यातही अपघात
मे महिन्यात कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या एसटी बसच्या अपघातात एसटी चालकासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मुरबाड तालुक्यातील वैशाखारे गावात हा अपघात झाला होता. कल्याणहून अहिल्यानगरला जाणाऱ्या एसटीची एका स्कॉर्पिओ एसयूव्हीसोबत धडक झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. दोन्ही गाड्यांना मोठं नुकसान झालं आणि अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता.
अभिषेक भानूदास मोटे (वय ३५) असं मृत एसटी चालकाचं नाव होतं. अविनाश रामचंद्र काकडे (५२), मीना कल्पाना माडके (५१) आणि निता अशोक दुरे (५२) या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. हे तिघंही नगरचे रहिवासी होते. याशिवाय अपघातात चार जणं जखमी झाले होते. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. या भीषण अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा