Headlines

एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण-CSMT लोकलमध्ये तांत्रिक बिघाड| Maharashtra Times


Kalyan-CSMT AC Local: दिवसेंदिवस एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडांच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लोकलमधील एसी अचानक बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला आता कल्याण रेल्वे स्थानकावर एसी लोकलचे काही दरवाजे बंद राहिल्याने गोंधळ उडाला.

मुंबई एसी लोकल दरवाजा
म.टा वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५४ वाजता मुंबईच्या निघणाऱ्या वातानुकूलित (एसी) लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एका दरवाजातूनच लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दरवाजा बंद करण्यास मदत केली. त्यानंतर ही लोकल ‘सीएसएमटी’कडे रवाना झाली.

प्रवाशांना बाजूला करत दरवाजा बंद केला

कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या एसी लोकलमध्ये सहजपणे चढता-उतरता यावे, यासाठी प्रवासी फलाटावर रांगा लावतात. गाडी थांबल्यानंतर प्रवासी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून लोकलमध्ये प्रवेश करतात. मात्र सकाळी ८.५४ वाजता मुंबईकडे जाणारी एसी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक-५वर दाखल झाल्यानंतर तिचे बहुतांश दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. लोकलचा एकच दरवाजा उघडा असल्याने जागा मिळवण्यासाठी प्रवाशांनी त्याकडे धाव घेतली. परिणामी दरवाजाजवळ प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यांनी प्रवाशांना बाजूला करत दरवाजा बंद करण्यास मदत केली आणि लोकल मार्गस्थ करण्यात आली.

Maharashtra TimesBullet Train: बुलेट ट्रेनमुळे भूमिपुत्रांवर अन्याय; शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा सत्ताधारी शिवसेनेकडून आरोप

या गोंधळात अनेक प्रवाशांना ही लोकल सोडावी लागली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. लोकलचे दरवाजे अचानक का लॉक झाले, याबाबतची अधिकृत माहिती मात्र मिळू शकलेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे लोकलचे दरवाजे बंद राहिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्मचारी बॅग आणि छत्र्या घेऊन ट्रेनमध्ये गर्दीत प्रवेश करतात. त्यात अशा घटनांमुळे ते अजून कठीण होतं.

प्रवाशांच्या मते कोपर आणि डोंबिवली स्थानकावरील प्रवासी डाऊन मारून एसी लोकलमध्ये असतात. त्यामुळे लोकल सुटण्यापूर्वीच ट्रेनमध्ये गर्दी असते. त्यामुळे कल्याण स्थानकावरील प्रवाशांना चढण्यासाठी अधिक अडचण निर्माण झाली.

रेल्वे अधिकाऱ्याची २६ लाखांची फसवणूक

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याची मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून २६ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी या अधिकाऱ्याचा सहकारी आणि त्याच्या पत्नीसह चौघांविरुद्ध वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra TimesMumbai Metro 5: ठाणे-भिवंडी-उल्हासनगरपर्यंत जोडणार मेट्रो लाइन ५, तीन टप्पे, डेपोच्या कामांना वेग; पहिला टप्पा लवकरच पूर्ण

वरिष्ठ अभियंता शीव परिसरात वास्तव्यास आहेत. सप्टेंबर २०२५मध्ये ते मुलीच्या एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांच्यासोबत रेल्वेत काम करणाऱ्या सहकाऱ्याने आपल्या पत्नीच्या ओळखीतील एक व्यक्ती प्रवेश मिळवून देण्याचे काम करतो, असे त्यांना सांगितले. त्याने अभियंत्याची या व्यक्तीसोबत भेट घालून दिली. त्याने पुण्याच्या सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ३० लाख रुपये डोनेशन व १५ लाख रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल, असे सांगितले. अभियंत्याने यातील ११ लाख रुपये सहकाऱ्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर वळते केले. मात्र, तीन आठवडे होऊनही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांनी आरोपींना विचारणा केली.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा