Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न चिघळला:उईके-विद्यार्थ्यांमधील चर्चा निष्फळ, आज फडणवीसांसोबत बैठक




राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि नोकरभरतीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध भागांत विद्यार्थी आंदोलन करत असून, सरकारकडून चर्चा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यामुळे या बैठकीत आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विविध असुविधांविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तब्बल दीड तास चर्चा होऊनही विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी वातावरण चांगलेच तापले. आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारसमोर आपल्या विविध मागण्या मांडत आंदोलन मागे घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी केली. ‘आताच राजीनामा द्या’, ‘आदिवासी मंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी वाढल्यानंतर मंत्री डॉ. अशोक उईके यांना पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलनस्थळावरून बाहेर पडावे लागले. चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने नाशिकमधील आंदोलन सुरूच आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक नाशिकमधील चर्चेनंतर आता आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज विद्यार्थ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनातील प्रलंबित मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारसमोर नोकरभरतीसह तब्बल 29 मागण्या मांडल्या आहेत. नागपूरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थीही विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ‘मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या तरच आंदोलन मागे घेऊ’, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पुण्यात 17 दिवसांपासून आंदोलन पुण्यातील मांजरी परिसरातही आदिवासी विद्यार्थी गेल्या 16 ते 17 दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करत आहेत. या विद्यार्थ्यांशी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तब्बल पाच तास चर्चा केली. यावेळी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळाशी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांनी लेखी आश्वासनाची मागणी केल्याने चर्चेतून अंतिम तोडगा निघाला नाही. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 12 हजार 500 पदांच्या नोकरभरतीची जाहिरात काढणे आणि मुला-मुलींसाठी शहराच्या ठिकाणी स्वतंत्र वसतिगृहे उपलब्ध करून देणे, या मागण्यांचा समावेश आहे. सरकारकडून दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, मांजरी येथील आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. आशोक उईकेंच्या घरावर लाँग मार्च अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घराच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला होता. या लाँग मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी सुमारे 45 किलोमीटरचा प्रवास केला. यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समिती परिसरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांची आदिवासी विकास मंत्र्यांसोबत भेट झाली. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेर आदिवासी विकास विभागाने काही मागण्यांबाबत विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करून अमरावतीकडे परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मात्र, नाशिक, पुणे आणि नागपूरमध्ये अद्याप आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या या आंदोलनाचा सरकार कशा पद्धतीने तोडगा काढते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये आज होणारी बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. कुंभमेळ्याच्या तयारीवर फडणवीसांचा मोठे विधान:नाशिककरांच्या सध्या शिव्या खाव्या लागतायत, पण कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला. नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात ते बोलत होते. सविस्तर वाचा..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत