टिळकवाडीतील कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक, 160 कोटींहून अधिक गुंतवणूक
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बेळगावात आर्थिक फसवणुकीची प्रकरणे सुरूच आहेत. शिवम असोसिएट्स, आदित्यराज कॅपिटल्स, ग्रोधन सिटी इंडेक्स आदी संस्थांच्यानंतर टिळकवाडी पोलीस स्थानकात आणखी एका ट्रेडिंग कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या ट्रेडिंग कंपनीत 3 हजारहून अधिक जणांनी 160 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या महिन्यात 13 जुलै रोजी अशोक बिसगुप्पी (वय 43) राहणार कौजलगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपेक्स ब्रिजकॉर्प एलएलपी ट्रेडिंग कंपनी, मंगळवार पेठ, टिळकवाडी या कंपनीशी संबंधित आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावात आणखी अनेक कंपन्या सध्या जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत.
कंपनीचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर काशिनाथ वाघमारे यांच्यासह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कंपनीमध्ये सुमारे 3 हजारहून अधिक जणांनी 160 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूक केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ही रक्कम शेअरबाजार व रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याबरोबरच कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वत:ही वापरली असल्याचे आरोप केले जात आहेत.
गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेण्यात आली असून या रकमेतून स्वत:च्या नावेही मालमत्ता खरेदी करून गुंतवणुकीच्या रकमेचा दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे बड्स व केपीआयडी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून पोलिसांनी चौकशी हाती घेतली आहे. चिकोडी येथील एका तरुणाला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
शिवबसवनगर येथील बहुचर्चित शिवम असोसिएट्सवरील कारवाईपासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. 14 मे रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशावरून महसूल, सहकार व पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी शिवम असोसिएट्सवर छापे टाकून तपासणीला सुरुवात केली होती. सध्या हे प्रकरण सीआयडीकडे आहे. शिवानंद निलण्णावर यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आणखी एका ट्रेडिंग कंपनीविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 40 हजारहून अधिक गुंतवणूकदारांकडून 2 हजार 300 कोटी रुपये शिवम असोसिएट्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारही अडचणीत येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा अधिक नफा घेतलेल्या गुंतवणूकदारांना नोटिसा पाठवण्यासाठी सीआयडीने तयारी केली असून ती रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सीआयडीतर्फे होणार चौकशी
50 कोटींहून अधिक गुंतवणूक किंवा अधिक प्रमाणातील फसवणूक असणाऱ्या प्रकरणांची चौकशी सीआयडीकडे सोपविली जाते. या निकषानुसार अपेक्स ब्रिजकॉर्प एलएलपी ट्रेडिंग कंपनीचे प्रकरणही पुढील चौकशीसाठी सीआयडीकडे जाण्याची शक्यता आहे.
