Headlines

आज संकष्टी चतुर्थी श्रावणी सोमवारचा पॉवरफुल योगायोगावर बनवा 24 तास मऊ राहतील उकडीचे मोदक – how to make ukadiche modak in marathi


Sankashti Chaturthi 2026 Ukadiche Modak Recipe
फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen
गणपती बाप्पांना प्रिय असलेला मोदक हा महाराष्ट्राच्या घराघरातील श्रद्धेचा आणि चवीचा अविभाज्य भाग आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक केले जातात. यंदाच्या संकष्टी चतुर्थीला श्रावणी सोमवारचा योगायोग आल्यामुळे भक्तांसाठी हा दिवस विशेष मानला जात आहे. या शुभदिनी गणपती बाप्पांना आपल्या हाताने बनवलेले गरमागरम, मऊसूत आणि चविष्ट मोदक अर्पण करायचे असतील, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. अनेकदा उकडीचे मोदक बनवताना त्यांची उकड कडक होते, मोदक फुटतात किंवा वाफवल्यानंतर काही वेळातच मोदक कोरडे पडतात. मात्र योग्य प्रमाणात पाणी, दूध आणि तेल वापरले आणि उकड व्यवस्थित मळली, तर मोदक 24 तास मऊ राहण्यास मदत होते.सरिता किचनने त्यांच्या युट्युब चॅनलवर ही खास रेसिपी आणि खास टिप्स शेअर केली आहे.चला तर मग पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मऊसूत उकडीचे मोदक कसे बनवायचे. (फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen)

उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य

उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य

सारणासाठी
1 कप ताजा किसलेला नारळ
¾ ते 1 कप गूळ
1 ते 2 चमचे खसखस
½ चमचा वेलची पूड
थोडे जायफळ
काजू, बदाम किंवा आवडीनुसार ड्रायफ्रूट्स
1 चमचा तूप
उकडीसाठी
1 कप बारीक तांदळाचे पीठ
½ कप पाणी
½ कप दूध
1 चमचा तूप किंवा तेल
चिमूटभर मीठ
इथे पाणी आणि दूध समान प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे. दुधामुळे उकड मऊ राहण्यास मदत होते, तर तूप किंवा तेलामुळे उकडीला चांगला मऊपणा येतो.

सर्वात आधी बनवा स्वादिष्ट सारण

सर्वात आधी बनवा स्वादिष्ट सारण

एका कढईत एक चमचा तूप गरम करा. त्यात खसखस घालून हलकी भाजून घ्या. त्यानंतर त्यात किसलेला नारळ घाला. नारळ जास्त वेळ भाजू नका. तो फक्त हलका गरम झाला की त्यात किसलेला किंवा बारीक केलेला गूळ घाला.गूळ वितळायला लागल्यानंतर नारळ आणि गूळ एकत्र व्यवस्थित मिसळा. या मिश्रणात वेलची पूड आणि थोडे जायफळ घाला. आवडत असल्यास बारीक चिरलेले काजू-बदाम किंवा इतर ड्रायफ्रूट्सही घालू शकता.सारण सतत ढवळत राहा. गुळामुळे मिश्रणाला पाणी सुटू शकते. त्यामुळे सारण खूप पातळ ठेवू नका. साधारण घट्टसर आणि ओलसर सारण तयार झाले की गॅस बंद करा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या. सारण जास्त शिजवल्यास ते कोरडे होते आणि मोदक भरताना किंवा खाल्ल्यावर मोदकाचा आतला भाग कोरडा वाटू शकतो.

मऊ उकड बनवण्याची खास पद्धत

मऊ उकड बनवण्याची खास पद्धत

आता मोदकाची उकड तयार करण्याची वेळ आली आहे. एका जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घ्या. त्यात एक चमचा तूप किंवा तेल आणि चिमूटभर मीठ घाला.हे मिश्रण उकळू द्या. पाणी-दूध व्यवस्थित उकळू लागले की गॅस मंद करा आणि त्यात एक कप तांदळाचे पीठ हळूहळू घाला.पीठ घालताना दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पीठ सर्व द्रव शोषून घेतल्यानंतर गॅस बंद करा.पातेल्यावर झाकण ठेवून ही उकड 5 ते 10 मिनिटे वाफेवर मुरू द्या. यामुळे तांदळाचे पीठ व्यवस्थित शिजते आणि पुढे मोदक वळताना उकड फाटण्याची शक्यता कमी होते.

उकड मळताना ही चूक करू नका

उकड मळताना ही चूक करू नका

उकड थोडी कोमट असताना ती एका परातीत काढा. हाताला थोडे तूप किंवा तेल लावा आणि उकड चांगली मळून घ्या.उकड खूप गरम असेल तर हात भाजू शकतो, त्यामुळे हाताळण्याइतकी कोमट झाल्यावरच मळा. उकड मळताना ती अगदी गुळगुळीत आणि मऊ झाली पाहिजे.जर उकड थोडी कडक वाटत असेल तर हाताला थोडे कोमट पाणी किंवा तूप लावून पुन्हा मळा. उकडीमध्ये कोरडे तांदळाचे पीठ वाढवू नका. जास्त पीठ घातल्यास मोदक कडक होण्याची शक्यता असते.उकड मळून झाल्यावर ती नेहमी ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवा. उकड उघडी ठेवल्यास वरचा थर पटकन कोरडा होतो.

संकष्टी चतुर्थी 2026 उकडीचे मोदक रेसिपी

मोदकाला सुंदर पाकळ्या कशा पाडायच्या?

मोदकाला सुंदर पाकळ्या कशा पाडायच्या?

आता उकडीचा छोटासा गोळा घ्या. हाताला थोडे तूप लावा. गोळा हातात घेऊन अंगठ्याच्या मदतीने त्याला हळूहळू वाटीसारखा आकार द्या.ही वाटी खूप जाड किंवा खूप पातळ नसावी. कडा थोड्या पातळ आणि मधला भाग तुलनेने मजबूत ठेवला तर मोदक भरताना तो फाटत नाही.आता त्यामध्ये तयार केलेले नारळ-गुळाचे सारण भरा. त्यानंतर कडांवर बोटांच्या मदतीने एकसारख्या छोट्या छोट्या पाकळ्या पाडा. सर्व पाकळ्या वरच्या बाजूला एकत्र आणून मोदकाला छान शेंडीचा आकार द्या.सुरुवातीला पाकळ्या पाडणे अवघड वाटू शकते, पण दोन-तीन मोदक केल्यानंतर हात बसतो. पाकळ्या अगदी परफेक्ट असण्याची गरज नाही; प्रेमाने केलेला नैवेद्य हीच खरी ओळख आहे.

मोदक वाफवण्याची योग्य पद्धत

मोदक वाफवण्याची योग्य पद्धत

मोदक वाफवताना मोदकपात्र किंवा इडलीपात्र वापरू शकता. पात्रात पाणी गरम होण्यासाठी ठेवा.एका चाळणीवर किंवा मोदक वाफवण्याच्या प्लेटवर कापड किंवा केळीचे पान ठेवू शकता. त्यावर तयार केलेले मोदक थोड्या अंतरावर ठेवा.मोदक वाफवण्यापूर्वी त्यांच्यावर हलके पाणी शिंपडा. त्यानंतर पात्र झाकून साधारण 10 ते 15 मिनिटे मोदक वाफवून घ्या.वाफवताना झाकण वारंवार उघडू नका. वाफ व्यवस्थित राहिली तर मोदक छान शिजतात.

24 तास मोदक मऊ ठेवण्यासाठी खास टिप्स

24 तास मोदक मऊ ठेवण्यासाठी खास टिप्स
  • उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशीही मऊ हवे असतील तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
  • उकड बनवताना पाणी आणि दूध समान प्रमाणात वापरा.
  • उकडीत थोडे तूप किंवा तेल नक्की घाला.
  • उकड मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत व्यवस्थित मळा.
  • तयार उकड कधीही उघडी ठेवू नका; ओल्या कापडाने झाकून ठेवा.
  • सारण खूप कोरडे करू नका.
  • मोदक जास्त वेळ वाफवू नका.
  • वाफवलेले मोदक पूर्णपणे कोरडे होऊ देऊ नका.
  • मोदक थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवले तर त्यांचा मऊपणा टिकण्यास मदत होते.
  • दुसऱ्या दिवशी मोदक खायचे असल्यास गरम करण्यासाठी पुन्हा थोडे वाफवू शकता.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा