आचरा प्रतिनिधी : आचरा गावात सबस्टेशन असूनही सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचे पडसाद आचरा ग्रामसभेत उमटले. पत्र देऊनही ग्रामसभेत वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी आचरा वीज वितरण कार्यालयातून सभेस हजर असलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत,”जोपर्यंत ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नाही, तोपर्यंत एकही ग्रामस्थ वीजबिल भरणार नाही,” असे स्पष्ट केले. तसेच, ग्रामसभेत वीज वितरणची वीजबिले न भरण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी, गावात कोणावरही जोरजबरदस्ती करून वीज मीटर बसवल्यास होणाऱ्या परिणामास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, असे सांगत स्मार्ट मीटरला विरोध करणारा ठरावही मंजूर करण्यात आला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवर संपर्क साधून, “उद्या गावात येऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यावर योग्य उपाययोजना करू,” असे आश्वासन दिले.
आचराचे सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी आचरा ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, पूर्वा तारी, सावंत, चंदू कदम, अनिल करंजे, मंगेश टेमकर, पांडुरंग वायंगणकर, सुरेश ठाकूर, एकनाथ आचरेकर, नारायण कुबल, समीर ठाकूर, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, चंदन पांगे, सुनील दुखंडे, शाम घाडी आदी उपस्थित होते.
