Umpire hit by ball : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ईस्ट दिल्ली रायडर्स आणि नवी दिल्ली टायगर्सच्या सामन्यात धक्कादायक घटना घडली. वेगवान स्ट्रेट ड्राइव्ह थेट अंपायर धर्मेश भारद्वाज यांच्या चेहऱ्यावर आदळला. त्यांना रुग्णालयातील ICUमध्ये दाखल करण्यात आले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंना दुखापत झाल्याच्या घटना आपण पाहतो. मात्र, सध्या सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीग ( DPL 2026 ) स्पर्धेत एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. ईस्ट दिल्ली रायडर्स आणि नवी दिल्ली टायगर्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका वेगवान शॉटमुळे चेंडू थेट अंपायरच्या तोंडावर जाऊन आदळला. चेंडूचा फटका इतका भयंकर होता की, अंपायरला तातडीने रुग्णालयात नेऊन अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले आहे. या भयानक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दुखापतग्रस्त अंपायरचे नाव धर्मेश भारद्वाज असे आहे. धावांचा पाठलाग करत असताना नवी दिल्ली टायगर्सच्या डावातील १८ व्या षटकात ही घटना घडली. फिरकीपटू मीना गोलंदाजी करत असताना फलंदाजाने एक अत्यंत वेगवान ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ शॉट खेळला. चेंडूचा वेग इतका जास्त होता की, अंपायरला स्वतःला वाचवण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला. त्यांनी चेंडूपासून वाचण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट त्यांच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. चेंडू लागताच अंपायर गंभीर झाले. हे दृश्य पाहून शॉट मारणाऱ्या फलंदाजालाही मोठा धक्का बसला आणि अत्यंत पश्चात्तापाने त्याने आपले डोके धरले, हे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
या घटनेचे समालोचन करणाऱ्या कॉमेंटेटर्सनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यात अंपायर धर्मेश भारद्वाज यांना चेंडू लागण्याची ही दुसरी वेळ होती. मात्र, यावेळी चेंडू थेट तोंडावर लागल्याने दुखापत गंभीर होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्ली प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत वैद्यकीय माहिती देण्यात आलेली नाही.
सलग ६ पराभवांनंतर ईस्ट दिल्ली रायडर्सचा विजय
या सामन्याच्या निकालाचा विचार केल्यास, ईस्ट दिल्ली रायडर्सने ३६ धावांनी शानदार विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना ईस्ट दिल्लीने २० षटकांत ७ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नवी दिल्ली टायगर्सचा संघ १९.२ षटकांत १५६ धावांवर सर्वबाद झाला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा