![]()
नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य कार्यकर्ता ते नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचा संपर्क साधला असून, सामाजिक बांधिलकी जपली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे निष्ठावान व विश्वासू सहकारी म्हणून अमोल धवसे यांची तालुक्यात ओळख आहे. नांदगाव नगरपंचायत निवडणुकीत शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करत काँग्रेसचे सर्वाधिक पाच नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवार्षिकमध्ये नांदगाव नगरपंचायतीवर काँग्रेसचा पहिला नगराध्यक्ष विराजमान झाला होता. आपल्या पुनर्निवडीबद्दल अमोल धवसे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखडे तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांचे आभार मानले. यापुढेही काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करून शहरातील संघटन मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Source link
अमोल धवसे यांची नांदगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी पुनर्निवड:पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका
