![]()
नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून, माजी सैनिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सैनिक आणि नागरी प्रशासनाशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी कर्नल दुग्गल यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा सैनिक कल्याण मंडळ कार्यालयाशेजारील जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर (सेना मेडल) यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याचे आयोजन ‘यशसिद्धी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन’, ‘सैनिक फेडरेशन’ आणि ‘एक्स सर्व्हिस मूव्हमेंट महाराष्ट्र राज्य’ या तीन संघटनांतर्फे संयुक्तपणे करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील २०० हून अधिक माजी सैनिक उपस्थित होते. कर्नल नवनीत दुग्गल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सब एरिया नागपूरची यंत्रणा नेहमीच तत्पर आहे. माजी सैनिक आपल्या समस्या थेट त्यांच्याकडेही पाठवू शकतात आणि त्यावर त्वरित तोडगा काढण्यास आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान, नागपूरहून आलेल्या चमूने इंटरनेट उपकरणांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने माजी सैनिकांच्या तक्रारी व अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्या अर्जांमध्ये काही त्रुटी होत्या, त्यांची पूर्तता करण्याबाबत संबंधित सैनिकांना सूचित करण्यात आले. उर्वरित सर्व निवेदने सब एरिया नागपूर येथे नेण्यात आली असून, ऑनलाईन प्रणालीद्वारे ती विविध सैन्य दलांच्या रेकॉर्ड ऑफिसकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जातील. यावेळी बोलताना सुभेदार प्रदीप गायकवाड यांनी माजी सैनिकांना एकजूट राहण्याचे आणि आपल्या समस्या वैधानिक व संयमी मार्गाने प्रशासनासमोर मांडण्याचे आवाहन केले. सुभेदार अविनाश गायकवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवालदार भीमराव गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन हवालदार गजानन इंगळे यांनी केले. आभार हवालदार दिवाकर नागपूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हवालदार मारुती भडके, सुभेदार डॉ. प्रा. सुभाष देवपारे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी
