Headlines

अपुऱ्या बळावर लोकलची धाव! मध्य रेल्वेत केवळ ५३% लोकोपायलट; पश्चिम रेल्वेत सुरक्षा दलाच्या हजारो जागा रिक्त


लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. तसेच, लोकल ट्रेनची गर्दी आणि कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात हजारो पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

अपुऱ्या बळावर लोकलसेवा
महशे चेमटे, मुंबई: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेची धाव अपुऱ्या मनुष्यबळावर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका बाजूला लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि प्रवासी सुविधांच्या घोषणा केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर हजारो जागा रिक्त आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे ४४ टक्के लोकोपायलटच्या आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे २७ टक्के रेल्वे सुरक्षा दलाच्या जागा रिक्त आहेत.

अतिरिक्त फेऱ्यांचा वाढीव भार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात लोकोपायलटच्या जवळपास ४४ टक्के जागा रिक्त असल्याने जवळपास प्रत्येक दुसऱ्या मंजूर पदावर कर्मचारीच नसल्याची माहिती समोर आली आहे. १,६३५ मंजूर पदांपैकी केवळ ९२५ लोकोपायलट कार्यरत असून ७१० पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या तुटवड्यानंतरही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सांभाळण्यासाठी उपलब्ध लोकोपायलटवर अतिरिक्त फेऱ्या आणि वाढीव कामाचा भार टाकला जात असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे रिक्त जागेवर योग्य उमेदवाराला संधी देणे गरजेचे आहे.

Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: बलुेट ट्रेनसाठी खाडीखालून बोगद्याचं काम सुरू, भारतात पहिला पाण्यातील रेल्वेमार्ग; दुसऱ्या ‘टीबीएम’ने खोदकाम

तिकीट तपासनीसांची ३४.५१ टक्के पदे आणि गार्डची २८.२० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे तिकीट तपासणी मोहिमा, महसूल संरक्षण आणि गाड्यांच्या हाताळणीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. यार्ड आणि पॉइंट ऑपरेशनसाठी महत्त्वाच्या असलेल्या पॉइंटसमनच्या १,९५० मंजूर पदांपैकी ६८० पदे रिक्त आहेत. यामुळे रोजच्या देखभालीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पश्चिम रेल्वेची स्थिती तुलनेने चांगली वाटत असली तरी प्रवासी सुरक्षेबाबत धोक्याची घंटा कायम आहे. आरपीएफच्या १,९१८ मंजूर पदांपैकी ५०५ पदे म्हणजेच जवळपास २७ टक्के जागा रिक्त आहेत. रोज लाखो प्रवाशांची सुरक्षा सांभाळणाऱ्या यंत्रणेतच तूट असल्याने गुन्हेगारी, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसादावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गार्डची २५ टक्के पदे रिक्त आहेत. लोकोपायलटची १९३ पदे रिक्त असून मोटरमनची ७७ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदे वर्षानुवर्षे न भरल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांनाच अतिरिक्त ड्युटी आणि कमी विश्रांतीच्या आधारावर मुंबईतील रेल्वे गाड्यांचा कारभार रेटावा लागत आहे. दीर्घकाळ सुरू असलेली ही परिस्थिती कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक ताणात भर घालत असून, त्याचे पडसाद रेल्वेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम सेवांवर उमटण्याची भीती रेल्वे अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

आणखी १० फेऱ्या १५ डबा

अंबरनाथ ते कर्जतदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोमवारपासून काहीअंशी दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने २० जुलैपासून १२ डब्यांच्या १० लोकल गाड्यांचे रूपांतर १५ डब्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासी क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

Maharashtra TimesCentral Railway: मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढणार, CSMT-कल्याण, कर्जत मार्गावर दहा फेऱ्या; वेळापत्रक कसं असेल?

कल्याण ते कर्जतदरम्यान फलाट विस्तार कामे पूर्ण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव फेऱ्यांमध्ये आठ धीम्या, दोन जलद लोकल आहेत. डाऊन मार्गावर सकाळी ९.१५ सीएसएमटी–अंबरनाथ, दुपारी १२.२६ सीएसएमटी-कल्याण, दु. ३.०३ सीएसएमटी-बदलापूर, सायं. ६.२२ सीएसएमटी-कर्जत आणि रात्री ११.०८ सीएसएमटी-अंबरनाथ अशा लोकल धावणार आहेत. अप मार्गावर स. ७.५१ अंबरनाथ-सीएसएमटी, सकाळी ११.०३ अंबरनाथ-सीएसएमटी, दुपारी १.३६ कल्याण-सीएसएमटी, सायंकाळी ४.४७ बदलापूर-सीएसएमटी आणि रात्री ८.३८ वाजता कर्जत-सीएसएमटी अशा लोकल धावणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा