Headlines

अंतराळातील एक ग्रह बनू शकतो भविष्यातील ‘इंधन डेपो’, नासाच्या दाव्याने जगभरातील शास्त्रज्ञ थक्क!। Maharashtra Times


अंतराळ संशोधनात आता एक अत्यंत क्रांतिकारी टप्पा समोर आला आहे. शास्त्रज्ञांना शनीच्या टायटन चंद्रावर मानवी वस्ती उभारण्यासाठी आणि अंतराळ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी आवश्यक असणारे मुबलक स्त्रोत सापडले आहेत. उणे 179 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या या जगामध्ये दडलेला नैसर्गिक वायूचा खजिना नेमका कसा वापरला जाईल, पाहा या विशेष रिपोर्टमध्ये. यासंदर्भातलं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने (REF.) दिलं आहे.

नासाच्या ‘गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर’चे शास्त्रज्ञ कॉनोर ए. निक्सन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानुसार, पृथ्वीनंतर ‘टायटन’ हा मानवासाठी अंतराळातील सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचा ग्रह ठरू शकतो.

इंधनाचा आणि पाण्याचा साठा

‘कॅसिनी-हायगेन्स’ मोहिमेने गेल्या काही दशकांत पाठवलेल्या माहितीचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, टायटनवर प्रचंड प्रमाणात हायड्रोकार्बन्स (इंधन आणि नैसर्गिक वायू), पाण्याचा बर्फ आणि वातावरणीय संसाधने उपलब्ध आहेत.

अंतराळातील इंधन डेपो

या साठ्यामुळे भविष्यात जेव्हा मानव सौरमालेत अधिक खोलवर प्रवास करेल, तेव्हा टायटनचा वापर अंतराळ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी, औद्योगिक तळ उभारण्यासाठी आणि पुढील प्रवासाचे मुख्य द्वार म्हणून केला जाऊ शकतो. दीर्घकालीन मानवी वस्त्या उभारण्यासाठी टायटन हा संपूर्ण सौरमालेतील सर्वात आशादायक आणि योग्य चंद्र ठरू शकतो.

सौरमालेतील सर्वात वेधक आणि गूढ जगांपैकी एक म्हणजे शनीचा चंद्र ‘टायटन’ होय. संपूर्ण सौरमालेत स्वतःचे दाट वातावरण असलेला हा एकमेव चंद्र आहे. इतकेच नाही तर, पृथ्वीव्यतिरिक्त टायटन हा जगातील एकमेव असा ग्रह आहे ज्याच्या पृष्ठभागावर द्रव स्वरूपातील मोठे साठे स्थिर अवस्थेत अस्तित्वात आहेत.

मात्र, पृथ्वीच्या विपरीत टायटनवरील नद्या, तलाव आणि समुद्र हे पाण्याने भरलेले नाहीत. त्याऐवजी, तिथे द्रवरूप मिथेन आणि इथेन या हायड्रोकार्बन्सचा प्रचंड साठा आहे, जे आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक वायू आणि इतर इंधन निर्माण करणाऱ्या घटकांशी साम्य राखतात.

सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, टायटनवर पृथ्वीसारखेच पण ‘मिथेनवर आधारित’ हवामान चक्र चालते. तिथे मिथेनचे बाष्पीभवन होते, त्याचे ढग तयार होतात आणि नंतर पृष्ठभागावर मिथेनचाच पाऊस पडतो.

अंतराळ मोहिमांसाठी जगातील सर्वात रंजक ठिकाण बनला

नासाच्या (NASA) या ताज्या संशोधनातून टायटनवरील हायड्रोकार्बन्सच्या अथांग संपत्तीवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. टायटनच्या दाट वातावरणामध्ये साधारणपणे 5 टक्के वाटा मिथेन वायूचा आहे. तर त्याहून अधिक मोठे हायड्रोकार्बन्सचे साठे तिथल्या नद्या, समुद्र आणि पृष्ठभागावर ठिकठिकाणी पसरलेले आहेत.

भविष्यातील अंतराळवीरांसाठी हे घटक अत्यंत मूल्यवान सिद्ध होऊ शकतात त्यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत

  • रॉकेट इंधन: टायटनवरील मिथेनचा वापर थेट रॉकेटचे इंधन म्हणून केला जाऊ शकतो.
  • औद्योगिक वापर: तिथल्या जड हायड्रोकार्बन्सवर प्रक्रिया करून प्लास्टिक, कृत्रिम साहित्य, रसायने, सॉल्व्हेंट्स आणि इतर औद्योगिक कच्चा माल तयार केला जाऊ शकतो.

संशोधकांनी नोंदवले आहे की, टायटनवर उपलब्ध असणारे घटक हे पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या घरगुती स्वयंपाकाचा गॅस (LPG), हीटिंग फ्युअल, पेट्रोल, केरोसीन आणि इतर असंख्य औद्योगिक उत्पादनांसारखेच आहेत.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत