Headlines

ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत इम्रान हाश्मीने सनी देओलला टाकलं मागे, ‘आवारापन २’च्या इतक्या तिकीटांची विक्री


बॉक्स ऑफिसवर होणारी दोन मोठ्या सिनेमांची टक्कर काही नवीन नाही. १५ ऑगस्ट या खास दिवशी निर्माते त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी प्राधान्य देतात. या तारखेला किंवा जवळपासच्या तारखेला प्रदर्शित झालेल्या सिनेमांना यश मिळाल्याचं काही वर्षात दिसून आलं आहे. यंदाच्या वर्षाही स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये दोन मोठ्या चित्रपटांची जबरदस्त धडक पाहायला मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये दोन मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सनी देओल आणि प्रीती झिंटा यांचा ‘ बटवारा १९४७ ‘ तर दुसरा आहे इम्रान हाश्मीचा बहुप्रतिक्षित ‘ आवारापन २ ‘. या दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत इम्रान हाश्मीनं बाजी मारल्याचं आकडे सांगत आहेत.

प्रदर्शित होण्यापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’ या चित्रपटानं बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. गेल्या 24 तासांत ‘आवारापन २’च्या प्री-सेल्स बुकिंगमध्ये तब्बल १७१ टक्क्यांहून अधिकची मोठी वाढ झाली आहे.बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी हा चित्रपट बक्कळ कमाई करेल, असा अंदाज ट्रेड विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Maharashtra TimesGajendra Chauhan: राजा दशरथा समोर मॉडर्न कैकेयी, ‘महाभारत’ फेम युधिष्ठिर गजेंद्र चौहान यांची टीका, ‘रामायणा’ नावावरही आक्षेप
ॲडव्हान्स बुकिंगमधील कमाईची आकडेवारी

ट्रेड ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘आवारापन २’नं ‘बटवारा १९४७ ‘वर आघाडी घेतली आहे.

आवारापन २ ला का मिळतेय ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पसंती?

दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ‘आवारापन २’ची तिकिटं वेगानं विकली जात आहेत. एकट्या दिल्ली-एनसीआर क्षेत्रातून या चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगद्वारे ५० लाखांहून अधिकची कमाई केली आहे. आवारापन २च्या १००८९३ तिकिटांची विक्री झाली आहे. यातून सिनेमानं प्रदर्शानापूर्वीच ४ ते पाच कोटींच्यावर कमाई केली आहे. तर बटवारा १९४७ सिनेमानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अडीच कोटींच्या जवळपास कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

Maharashtra TimesDada Kondke Farm House: अ‍ॅडव्हान्स इन्कम टॅक्स भरायचे दादा कोंडके,भेटीसाठी लोकांची गर्दी; फार्महाऊसचा एरिया ऐकल्यावर शक्ती कपूर यांची झालेली बोलती बंद
‘आवारापन २’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पुढं असण्याची काही कारणं आहेत. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आवारापन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी सरासरी ठरला असला, तरी नंतर मात्र या चित्रपटाचं संगीत आणि ‘शिवम पंडित’ हे इम्रान हाश्मीचे पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. आता आवारापन २ या सिनेमात इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात शबाना आझमी, सुविंदर विक्की, विजयंत कोहली, अनिरुद्ध रावल आणि अतुल कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर या पात्राचं कमबॅक होत असल्यानं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

या सिनेमाला U/A प्रमाणपत्र मिळालं आहे, ज्यामुळे हा चित्रपट कुटुंबासह पाहता येईल. तर दुसरीकडे ‘बटवारा १९४७’ला A प्रमाणपत्र मिळाल्यानं त्याच्या प्रेक्षकवर्गावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. ‘बटवारा १९४७’ सिनेमात सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासोबत या सिनेमात शबाना आझमी, करण देओल (जावेद मिर्झा), अली फझल (हबीब अन्वर) आणि अभिमन्यू सिंग (याकूब खान) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘आवारापन २’ आणि ‘बटवारा १९४७’ चित्रपटांचं बजेट किती?

नितिन कक्कर दिग्दर्शित ‘आवारापन 2’ सिनेमा अवघ्या ३०कोटींच्या बजेटमध्ये तयार झाल्याचं म्हटलं जात आहे.तर दुसरीकडं राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बटवारा १९४७’चं बजेट १५० कोटींच्या घरात असल्याच्या चर्चा आहेत. कमी बजेटमुळं ‘आवारापन २’ला आपला खर्च वसूल करणं अधिक सोपं जाणार आहे.

स्पॉट बुकिंग आणि माऊथ पब्लिसिटी ठरवू शकते गेमचेंजर

तर व्यापार विश्लेषक तारण आदर्श यांच्या मते, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जरी इम्रान हाश्मीचा चित्रपट पुढं असला, तरी सनी देओलचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘गदर २’प्रमाणेच ‘बटवारा १९४७’ला स्पॉट बुकिंगचा तसंच माऊथ पब्लिसिटीचा मोठा फायदा मिळू शकतो, ज्यामुळं पहिल्या दिवसाच्या अंतिम कमाईत मोठी फेरबदल पाहायला मिळू शकतो.