![]()
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसने सोशल मीडियावर ‘गुंगी गुडिया’ असा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात थेट नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच घुसून जोरदार निदर्शने केली. मात्र, या आंदोलनानंतरही सपकाळ यांनी या टीकेचे समर्थन करत ‘सुनेत्रा पवार यांनी आपल्या कृतीतून उत्तर द्यावे’, असे विधान केले. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला असून, महिलांचा अवमान करणारे हे वादग्रस्त ट्विट तात्काळ हटवण्याची आक्रमक मागणी केली आहे. सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचा अपमान खपवून घेणार नाही. काँग्रेसने केलेल्या अपमानकारक पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची व सुनेत्रावहिनींची यांची जाहीर माफी मागावी. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो. परंतु महिलांचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही, असेही तटकरे यांनी म्हटले आहे. सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, राजकारणात विचारांचा मुकाबला विचारांनी व्हावा, मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर द्यावे. परंतु जेव्हा एखादा पक्ष महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरतो, तेव्हा तो आपल्या संस्कारांचा आणि राजकीय संस्कृतीचा खरा चेहरा जनतेसमोर आणतो. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत संवादाची आहे, व्यक्तीचा अपमान करण्याची नाही. काँग्रेसने या पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची आणि सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी. मतभेद लोकशाहीचा भाग आहेत. मात्र महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात तटकरे यांनी कॉंग्रेसला इशारा दिला आहे. महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही- प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील आक्षेप घेत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून करण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेचा आम्ही तीव्र निषेध करतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही. तसेच ज्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांसारख्या महिला नेत्या करत आहेत, त्याच पक्षाकडून एका महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. काँग्रेसने संबंधित पोस्ट तात्काळ मागे घेऊन जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. या संदर्भातील या देखील बातम्या वाचा ‘त्या’ वादग्रस्त पोस्टशी माझा संबंध नाही!:’गुंगी गुडिया’ वादावर पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले- सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील “हा केवळ माझ्या आईचा नाही, तर प्रत्येक महिलेचा अपमान!”:सुनेत्रा पवारांवरील टीकेवर जय पवारांचे काँग्रेसला सडेतोड उत्तर ‘इतक्या खालच्या स्तराला जाणारे पहिल्यांदाच पाहिले’:CM फडणवीसांचे प्रत्युत्तर, एकनाथ शिंदे म्हणाले- सुनेत्रा पवारांचा नव्हे तमाम माता-भगिनींचा अपमान सपकाळांची प्रेस सुरू असताना राष्ट्रवादीचा राडा:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले- गुंगी गुडिया ही शिवी नाही, सुनेत्रा पवारांनी स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करावं सुनेत्रा पवारांना ‘गुंगी-गुडिया’ म्हणणं कसली भाषा?:पृथ्वीराज चव्हाणांना हे योग्य वाटते का? अंजली दमानियांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Source link
सुनेत्रा वहिनी पवार यांचा अपमान खपवून घेणार नाही:कॉंग्रेसने जाहीर माफी मागावी, सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेलांचा इशारा
