पणजी : प्रतिनिधी
गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या मुख्यालयात काल बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सांगे मतदारसंघातील प्रमुख आदिवासी नेते सत्यवान गावंकर यांनी आपल्या पत्नी नीता गावंकर तसेच शेकडो समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष अॅड. कार्लोस आल्वारेस फेरेरा व सुनील कवठणकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर, माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर, गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आर्चित नाईक, सांगे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष डायगो फर्नांडिस, ज्येष्ठ काँग्रेस नेते रजनीकांत नाईक, कायतानो मार्टिन्स, जितेंद्र नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्यवान गावंकर व नीता गांवकर यांच्यासमवेत विशाल नाईक, प्राजोक कुर्डीकर, फ्रान्सिस फर्नांडिस, पुटू गावंकर, मिलन गांवकर, तन्वी गांवकर, ऊजारियो कार्व्हालो, अॅलेक्स फर्नांडिस, संजना देसाई, अनिश गावकर, संगम गावकर, कृष गावकर, अभय गावकर, विक्रांत गावकर, पूजा गावकर, लक्ष्मी गावकर, संजना गावकर, ऊपाली नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सांगे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष डायगो फर्नांडिस यांनी सर्वांचे स्वागत केले. नव्या सदस्यांचे प्रवेश अर्ज गिरीश चोडणकर आणि राजेश वेरेकर यांनी स्वीकारले. माणिकराव ठाकरे यांनी सत्यवान गावकर व नीता गावंकर यांना काँग्रेसची शाल परिधान करून स्वागत केले, तर अॅड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी त्यांना काँग्रेसचा ध्वज प्रदान करून पक्षात स्वागत केले.
गिरीश चोडणकर यांनी सत्यवान गावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस प्रवेशामुळे सांगे मतदारसंघात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून तळागाळात पक्ष अधिक सक्षम होईल, असे सांगितले.
