स्वतःच्या आध्यात्मिक भविष्याबद्दल तो आशादायी होता; पण कुठे तरी काही तरी चुकते आहे, असे त्याला हल्ली जाणवायला लागले होते.

आपण आध्यात्मिक व्यक्ती व्हायचे, हे त्याचे ध्येय होते. त्या ध्येयानुसार तो वागतही होता. अध्यात्म रुजावे यासाठी सांगितल्या जाणाऱ्या उपासना प्रक्रिया नित्य आणि नैमित्तिक स्वरूपात त्याच्या आचरणाचा भाग होत्या. सर्व देवता आणि संतमंडळी यांच्याबाबत त्याच्या मनात श्रद्धा होती. तसा तो सरळमार्गी. अगदी ‘मी मनातसुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही’ या प्रकारचा नसला, तरी नैतिकतेला प्राधान्य देत तो जगत आला होता. एकूणच, आध्यात्मिक प्रगतीला आपण लायक आहोत, असा विश्वास तो बाळगून होता.
आध्यात्मिकतेच्या संगोपनासाठी लागणाऱ्या साधनांची बेगमी असूनही, अपूर्णतेची जाणीव अधूनमधून त्याच्या मनात डोके वर काढत होती. हल्ली तर ती अपूर्णतेची जाणीव त्याला भंडावून सोडत असे. निरनिराळ्या आध्यात्मिक साधनांच्या अनुष्ठानाने मिळणारी सात्विक सुखाची लहर आताशा फिकी वाटत चालली होती. त्या अनुष्ठानांमुळे मिळणारी क्षणिक आश्वासकता, तो भर ओसरल्यानंतर मनाला येणाऱ्या रितेपणाची कुणकुण थांबवू शकत नव्हती. मनाला मोहून टाकणारे भक्तीचे देखावे आणि बुद्धीला विस्मित करणारे तत्त्वज्ञानाचे शब्दपांडित्य आताशा त्याला ‘आपण आध्यात्मिक वाटचाल करत असल्याची’ भावना निर्माण करत नव्हते. या गोष्टींच्या पलीकडे काही तरी आहे, ज्याचा स्पर्श व्हावा म्हणून आता तो तहानलेला आहे.
ते जे आहे, तेच सारभूत आहे, असे त्याच्या मनाने घेतले आहे. त्यासाठी रुळलेल्या वाटा सोडून स्वतःचा मार्ग चोखाळायची इच्छा आणि त्यासाठी घ्यावी लागणारी आंतरिक मेहनत घ्यायची त्याची तयारी दिवसेंदिवस वाढते आहे. ही मेहनत म्हणजे मन अधिकाधिक शुद्ध करण्यासाठी, ते निश्चल ठेवणे आहे हेही त्याला हळूहळू उमगत आहे.
सर्व भासमान जगामध्ये नित्य वसणाऱ्या आणि ‘स्वसंवेद्य’ असणाऱ्या त्या अनामिकाची ओढ त्याला आता चालवते आहे. ज्या दिवशी ही अपूर्णतेची जाणीव आणि त्यामागून येणारी अस्वस्थता त्याच्या मनात शिरली, तो दिवस भाग्यवान. ज्या कृपेची तो पूर्वी आतुरतेने वाट पाहत होता, ती कृपा अशी वेश बदलून त्याच्या अंतरात प्रवेशली होती आणि त्याला कल्पना नव्हती; पण तो आध्यात्मिक झाला होता.

