Headlines

श्रीलंकेला घरच्या मैदानावर 165 धावांनी लोळवलं; टीम इंडियाला WTCमध्ये मोठा फायदा, फायनलसाठी आता काय करावं लागेल?


India vs Sri Lanka 1st Test Result : गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेचा १६५ धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयामुळे भारताची WTC विजयाची टक्केवारीही बदलली आहे. मानव सुथारने सामन्यात १० विकेट्स घेतल्या.

India vs Sri Lanka Test
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गॉलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने आपली दादागिरी सिद्ध करत श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर चारीमुंड्या चित केले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा १६५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३७२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या २०६ धावांवर आटोपला. या मोठ्या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली असून, या विजयाचा फायदा भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतही झाला आहे.

मानव सुथारच्या फिरकीने श्रीलंकेची दाणादाण

दुसऱ्या डावात ३७२ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या सोनल दिनुषाने एकाकी झुंज देत ८४ धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार धनंजय डी सिल्वाने ५९ धावांचे योगदान दिले. मात्र, या दोघांचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाजाला भारतीय फिरकीपटूंसमोर तग धरता आला नाही.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test : भारताचा 600 व्या ऐतिहासिक सामन्यात दणदणीत विजय; मानव सुतारच्या 10 विकेट, सामनावीर कोण?

भारताकडून युवा फिरकीपटू मानव सुथार याने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत ६ बळी मिळवले, तर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने २ गडी बाद केले. विशेष म्हणजे, मानव सुथारने या संपूर्ण सामन्यात दोन्ही डावांत मिळून तब्बल १० बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आणि भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

WTC गुणतालिकेत भारताला फायदा, पण…

या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत भारताच्या विजयाची टक्केवारी (PCT) ५३.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. या विजयासह टीम इंडियाने WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, भारताच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून संघ अद्याप ५ व्या स्थानावरच कायम आहे. दुसरीकडे, या दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या विजयाची टक्केवारी ३३.३३ वर घसरली असून ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

Maharashtra TimesUmpire injured DPL : आई गं! फलंदाजाचा वेगवान शॉट, चेंडू थेट अंपायरच्या चेहऱ्यावर आदळला; ICUमध्ये दाखल, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?

टॉप चार संघांच्या मजबूत कामगिरीमुळे भारतीय संघ अद्याप पाचव्या स्थानावरच आहे. ‘द ओव्हल’वर होणाऱ्या WTC २०२५-२७ च्या अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी भारतासमोर आता दोन मुख्य समीकरणे आहेत.

पहिले समीकरण: जर भारताने उर्वरित ८ कसोटी सामन्यांपैकी ७ सामने जिंकले, तर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के होईल आणि इतर कोणत्याही संघाच्या निकालावर अवलंबून न राहता ते थेट फायनलसाठी पात्र ठरतील.

दुसरे समीकरण: ६ सामने जिंकल्यास भारताची टक्केवारी ६२.९६ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जे संथ षटकांच्या दंडापासून (Slow over-rate penalty) वाचल्यास फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बऱ्यापैकी सुरक्षित मानले जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान कायम, बांगलादेश भारताच्या पुढे

WTC गुणतालिकेवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाने आपली निर्विवाद सत्ता कायम राखली असून ते ७७.७८ टक्के विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिका ७५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर न्यूझीलंड ७२.२२ टक्कयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा बांगलादेशचा संघ ६६.६७ टक्क्यांसह भारताच्या वर चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा