Dharmendra Pradhan Resignation Impact On Maharashtra : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार? यावर चर्चा सुरु आहे. आता महाराष्ट्रातल्या मोठ्या मंत्र्याने यावर भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीसह देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली असली, तरी याचा महाराष्ट्रातील राजकारणावर यत्किंचितही प्रभाव पडणार नाही, असा ठाम दावा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध पाटबंधारे कामांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी अलमट्टी धरणाचे व्यवस्थापन, महापूर नियंत्रण, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि संजय राऊतांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.
‘आंदोलनात राजकीय आणि समाजविघातक घटकांची घुसखोरी’
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी बोलताना विखे पाटील म्हणाले, “सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही आंदोलन सुरूच राहिले. मात्र, या आंदोलनाचा मार्ग बदलला असून यात राजकीय पक्ष आणि समाजविघातक प्रवृत्तींनी शिरकाव केल्याचे चित्र आहे.” शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हे आंदोलन संपायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, या संपूर्ण घटनेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलमट्टी धरणाचे व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण
सांगली-कोल्हापूरला भेडसावणाऱ्या महापुराच्या संकटावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी पूर नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी नियोजन करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. कर्नाटक सरकार आणि अलमट्टी धरण प्रशासनाशी महाराष्ट्र शासनाचा थेट व सातत्यपूर्ण संवाद सुरू आहे. पुराची तीव्रता कमी करण्यासाठी आणि भविष्यात ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
‘हैदराबाद गॅझेटची शंभर टक्के अंमलबजावणी’
मराठा आरक्षणाच्या संदर्भात विखे पाटलांनी सरकारची भूमिका मांडली. “हैदराबाद गॅझेटची १०० टक्के अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा करून अनेक कायदेशीर मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. आता कोल्हापूर गॅझेट लागू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत पूर्णपणे संवेदनशील असून सध्या आंदोलनाची तीव्रता खूपच कमी झाली आहे,” असे ते म्हणाले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा