![]()
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील लेणी क्रमांक 29 वरील धबधबा या पावसात दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. ‘सीतेचा नहाना’ म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा आणि त्यावरील सात कुंड पाण्याने तुडुंब भरल्याने लेणी परिसराचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सात कुंड भरून कोसळतोय धबधबा वरच्या बाजूला असलेल्या जोगेश्वरी लेणी परिसरातील सातही कुंड पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले आहेत. त्यातील साचले पाणी थेट कड्यावरून कोसळत असल्याने धबधब्याला अधिकच वेग आला आहे. हिरवाईने नटले डोंगर, धुक्याने वेढले वातावरण आणि धबधब्याचा गजर यामुळे वेरूळ लेणींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धबधब्याचे हे रौद्र आणि शांत रूप एकत्रित पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अनेक पर्यटक कैलास मंदिरासोबतच या धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत. प्रशासनाचा इशारा – लांबूनच आनंद घ्या धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने त्याच्या जवळचा परिसर निसरडा आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना आवाहन केले आहे की, धबधब्याचा आनंद लांबूनच घ्यावा. धबधब्याजवळ कोणीही जाऊ नये, सेल्फीसाठी धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, “धबधब्याचा आनंद हा सुखरूपपणे घ्या. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा.” पर्यटकांना आवश्यक त्या ठिकाणी खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात वेरूळ लेणींना लाभलेले हे निसर्गसौंदर्य पुढील काही दिवस असेच राहणार असून पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळाली आहे.
Source link
वेरूळमध्ये 'सीतेचा नहाना' धबधबा ओसंडून वाहिला:सातही कुंड तुडुंब भरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी! VIDEO
