Headlines

विभागीय आयुक्तांकडून 22 महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन




महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन केले. महसूल विभाग हा शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून लोकाभिमुख प्रशासन घडवावे, असे प्रतिपादन आयुक्त गुंडे यांनी केले. एक ऑगस्ट रोजी ‘महसूल दिना’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते ७ अधिकारी आणि १५ कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. अपर आयुक्त सुरज वाघमारे, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागातील पुरस्कारार्थी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना निवृत्त अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. आपल्या कोणत्याही कृतीने शासनाची प्रतिमा डागाळणार नाही याची दक्षता बाळगावी, असे ते म्हणाले. सामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नांचे निराकरण करणारा महसूल विभाग हा एकमेव विभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी योजना, धोरणे, उपक्रम आणि शासन निर्णयांची अंमलबजावणी तसेच महसूल गोळा करण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयातील सुरज वाघमारे (अपर आयुक्त), संतोष आठरे (तहसीलदार), मधुकर धुळे (नायब तहसीलदार), संतोष चव्हाण (निम्नश्रेणी लघुलेखक), उषा गवई (अव्वल कारकून), शशिकांत पाचघरे (महसूल सहाय्यक), संतोष चव्हाण (वाहन चालक), माया राजवाडे (शिपाई), अमरावतीचे अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांचा समावेश होता. याशिवाय शरद जावळे (एसडीओ, अकोला), जीवन मोराणकर (तहसीलदार, चिखलदरा), अनिल वाडेकर (नायब तहसीलदार, वाशिम), विद्या गोमासे (लघुलेखक, यवतमाळ), अरुण कुकडे (सहायक महसूल अधिकारी, अमरावती), वर्षा ठाकरे (सहायक महसूल अधिकारी, अकोला), चंद्रशेखर मनवर (मंडळ अधिकारी, वाशिम), अश्विनी फाटे (महसूल सहाय्यक, यवतमाळ), शैलेश घोगरे (ग्राम महसूल अधिकारी, वाशिम), अतुल टाके (वाहनचालक, यवतमाळ), आकाश वानखडे (शिपाई, अमरावती), छत्रपती मडावी (महसूल सेवक, यवतमाळ) आणि छायाबाई डहाके (पोलीस पाटील, वाशिम) यांचाही सत्कार करण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत