Headlines

‘लोकमान्य’ने लोकांचा विश्वास जपला


संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर : निपाणीत लोकमान्य शाखेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन थाटात

गेल्या पंचवीस वर्षात सहकार क्षेत्रात अनेक संकटे आली. अनेक संस्था, बँका बंद पडल्या. मात्र लोकमान्य सोसायटीच्या ठेवींमध्ये वाढच होत आहे. आज लोकमान्यकडे 12 हजार कोटींच्या ठेवी आहेत. को- ऑपरेटिव्ह क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी सोसायटी ठरलेल्या लोकमान्य सोसायटीने ठेवीदारांसह हितचिंतकांचा विश्वास जपला आहे. या विश्वासाला पात्र राहण्याची खबरदारी नक्की घेऊ. लोकमान्य टिळकांना प्रेरित असलेले सुराज्य डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य सोसायटीची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष तथा तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केले.

   त. भा. प्रतिनिधी

निपाणी : गेल्या पंचवीस वर्षात सहकार क्षेत्रात अनेक संकटे आली. अनेक संस्था, बँका बंद पडल्या. मात्र लोकमान्य सोसायटीच्या ठेवींमध्ये वाढच होत आहे. आज लोकमान्यकडे 12 हजार कोटींच्या ठेवी आहेत. को-ऑपरेटिव्ह क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी सोसायटी ठरलेल्या लोकमान्य सोसायटीने ठेवीदारांसह हितचिंतकांचा विश्वास जपला आहे. या विश्वासाला पात्र राहण्याची खबरदारी नक्की घेऊ. लोकमान्य टिळकांना प्रेरित असलेले सुराज्य डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य सोसायटीची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष तथा तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केले.

सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या निपाणी शाखेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा निपाणीत उत्साहात पार पडला. शहराबाहेरील समृद्धी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या नयनरम्य सोहळ्यात ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत शाखा व्यवस्थापक भूषण रेपे यांनी केले.

डॉ. किरण ठाकुर पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात सहकार खात्याकडून सहकारी संस्थांवर अनेक निर्बंध येत आहेत. त्यातूनही मार्ग काढत लोकमान्यची घोडदौड सुरू आहे. हे सर्व ठेवीदारांच्या पाठबळावर सुरू आहे. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी निपाणीत आलो आहे. युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, डॉ. किरण ठाकुर यांचे वृत्तपत्र, सहकार आणि उद्योग व्यवसायातील साम्राज्य अवघ्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्याला माहित आहे. लोकमान्य आणि अरिहंत समूहाचे कौटुंबिक नाते आहे. लोकमान्यने केवळ आर्थिक व्यवहार केला नाही तर राबवलेले सामाजिक उपक्रम वाखण्यासारखे आहेत. आजही सकाळी उठल्यानंतर तरुण भारत वाचल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही.

वडील दिवंगत रावसाहेब पाटील यांच्यानंतर आम्हा दोघा बंधूंवर डॉ. किरण ठाकुर यांनी आपला आशीर्वाद कायम ठेवावा, असे आवाहन केले. पंढरी परब म्हणाले, 31 ऑगस्ट 1995 मध्ये बेळगावातील टिळकवाडी येथील सुरू झालेल्या लोकमान्य सोसायटीचा विस्तार आज तीन राज्यात झाला आहे. दिवंगत बाबुराव ठाकुर यांच्यापासून सुरू झालेला सामाजिक सेवेचा वसा डॉ. किरण ठाकुर यांनी पुरेपूर जपला आहे. वृत्तपत्र, सहकार, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आदी क्षेत्रात डॉ. ठाकुर त्यांनी प्रचंड कार्य केल्याचे सांगितले.

ज्येष्ठ संचालक गजानन धामणेकर म्हणाले, बेळगावनंतर लोकमान्यच्या निपाणी शाखेचा ठेवीमध्ये सर्वाधिक दुसरा क्रमांक आहे. तरुण भारतने निपाणी भागातील शोषितांचा आवाज वेळोवेळी उठवल्याचे सांगितले. यावेळी निपाणी शहर आणि परिसरातील सहकार, सामाजिक, शिक्षण, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, ठेवीदार आणि सभासदांनी उपस्थित राहून लोकमान्य सोसायटीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी संस्थेच्यावतीने मान्यवर व ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, प्रा. डॉ. अच्युत माने, सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक विठ्ठल प्रभू, पंढरी परब, सुबोध गावडे, गजानन धामणेकर, निवृत्त कर्नल दीपक कुमार गुरुंग (सीएसओ), रिजनल मॅनेजर राघवेंद्र नवल्ली, निपाणी ब्रँच मॅनेजर भूषण रेपे, कोऑर्डिनेटर संतोष कृष्णाचे आणि दीपक पुरंत, रोहन कोठीवाले, किशोर बाली, महेश बागेवाडी, सचिन खोत, निलेश खोत, दिनकर पोवार, राजशेखर हिरेकुडी, मधुकर खवरे, अनिल भोसले, प्रशांत नाईक, जयराम मिरजकर, संजय सांगावकर, दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवर, लोकमान्यचे संचालक, कर्मचारी, ठेवीदार, हितचिंतक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगाव-निपाणीकरांचे अतूट नाते!

कार्यक्रमात बोलताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाजन अहवाल स्वीकारावा, असे सांगितले होते. त्यावेळी निपाणी भागातील 48 पैकी 40 गावे, बेळगाव भागातील 62 गावे देण्यात आली होती. केवळ बेळगाव शहर आणि 37 गावे दिली नव्हती. खानापूर भागातील 202 पैकी 152 गावे दिली होती तर 50 गावे दिली नव्हती. त्यावेळी निपाणेकरांनी ‘बेळगाव जिथे असेल तिथे निपाणी असेल’ असे सांगितले. यामुळे निपाणी आणि बेळगावचे विशेष नाते आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असूनही अजून न्याय मिळालेला नाही. लोकसभेत आश्वासने देऊनही त्यांचे पालन झालेले नाही. न्यायालयाबाहेर हा प्रश्न सोडवण्याची विनंती आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. तो सुवर्णक्षण केव्हा येईल? याची वाट पाहत असल्याचे सांगितले.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत