काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा विद्यार्थी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र राहुल गांधी येण्यापूर्वीच रात्री पुण्यात मोठा राडा पाहायला मिळाला. विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा वाद उफाळून आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस संलग्न ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांमध्ये कॉलेज शुल्काच्या मुद्यावरून जोरदार बाचाबाची व राडा झाला. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिस्थिती तापली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी भेट दिली.