सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या रविवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कणकवली जानवली येथील कृष्णनगरी राधेश्याम बँक्वेट्स अँड लॉन्स येथे होणाऱ्या सभेस ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) चे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत. या सभेत जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना आप्पासाहेब शिंदे हे बदलत्या औषध व्यवसायातील आव्हाने, नवीन कायदे, औषध वितरण व्यवस्थेचे भवितव्य, फार्मासिस्ट व औषध विक्रेत्यांची भूमिका, संघटनात्मक एकजूट आणि व्यवसायातील नव्या संधी या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
भारतातील औषध विक्रेता चळवळीतील ज्येष्ठ, दूरदर्शी आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे पाहिले जात असून औषध विक्रेते, फार्मासिस्ट आणि संपूर्ण औषध वितरण क्षेत्रासाठी गेली अनेक दशके अविरत कार्य करणारे ते राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आहे. त्यांनी द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट असोसिएशन (MSCDA) चे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात संघटनेचे मजबूत जाळे निर्माण करून औषध विक्रेत्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) चे अध्यक्ष म्हणून देशभरातील लाखो औषध विक्रेत्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोलाचे कार्य केले आहे.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सच्या फार्मा लिमिटेडचे चेअरमन म्हणून त्यांनी औषध वितरण व्यवस्थेला अधिक संघटित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच Educational & Welfare Trust च्या माध्यमातून गरजू औषध विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शैक्षणिक, वैद्यकीय आणि आर्थिक मदतीच्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याशिवाय, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या माध्यमातून राज्यातील नोंदणीकृत फार्मासिस्टांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या व्यावसायिक सन्मान, कौशल्यवृद्धी, सातत्यपूर्ण शिक्षण, व्यवसायातील संधी आणि फार्मसी व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय व उपक्रम राबविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. औषध व्यवसायात फार्मासिस्टचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी शिव निकेतन ट्रस्ट व भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली यांच्या माध्यमातून ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे अनेक उपक्रम राबविले आहेत.
असोसिएशनच्या सर्व केमिस्ट बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम सचिव संजय सावंत यांनी केले आहे.
