मोहरमची मिरवणूक सुरु असताना मुंबई पोलिसांनी एक महत्वाची कामगिरी पार पाडलीय. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात फैयाज प्रेमजी नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फैयाज प्रेमजीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वेदनाशामक म्हणून लोकांना कॅप्सूल वाटायला सुरुवात केली. जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना आरोपी लोकांना हे कॅप्सूल वितरित करत असल्याचे आढळले आहे. आता या कॅप्सूल्सबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
कॅप्सूल वाटप सुरु असताना सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची कॅप्सूल खाऊन तब्बेत बिघडली असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक वाढला आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फैयाज पुण्याच्या विमाननगर याठिकाणी राहतो. त्याने BBA केलेलं आहे, तो इराण आणि इराकला या देशांमधून परतलेला आहे.
14 हजार 900 कॅप्सूल्स पोलिसांनी केल्या जप्त
फय्याज निसार प्रेमजीची अधिक चौकशी केली असता असे समजले की, मोहरमच्या मिरवणुकीत मोफत कॅप्सूल वाटप करुन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा त्याचा उद्देश होता. वाटप करत असलेल्या कॅप्सूल मध्ये त्याने झिंक फॉसफईड नावाचा विषारी पदार्थ मिसळला होता. त्याच्याकडून 14 हजार 900 कॅप्सूल पोलिसांनी जप्त केल्या आहेत, एका कॅप्सूल मध्ये तो एक ग्रॅम झिंक फॉसफईड टाकत होता.
अन्यथा मोठा अनर्थ घडला असता..
या धक्कादायक घटनेवर पोलिसांनी सांगितले की, ’30 हजार रिकामी कॅप्सूलची त्याने ऑर्डर केली होती, 50 किलो झिंक फॉसफईडची ऑर्डर केली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. घटनेचा तपास सुरु आहे, आणखी काही माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, जर ही कॅप्सूल्स 14 हजार 900 लोकांनी खाल्ल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता.
