आजच्या डिजिटल युगात मोबाईल चोरीला गेल्यास डेटा आणि बँक खाती सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान असते. मात्र, भारत सरकारच्या अधिकृत ‘CEIR’ पोर्टलचा वापर करून ग्राहक आपला चोरीला गेलेला फोन देशभरात कायमचा ब्लॉक करू शकतात. यामुळे फोन निरुपयोगी ठरल्याने चोर पोलिसांच्या भीतीने तो फेकून पळ काढतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा केवळ संभाषणाचे साधन राहिलेला नाही, तर त्यात आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक फोटो, महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल ओळख साठवलेली असते. त्यामुळे जेव्हा एखादा मोबाईल चोरीला जातो किंवा हरवतो, तेव्हा माणसाला आर्थिक नुकसानीपेक्षा डेटा चोरीला जाण्याची भीती जास्त सतावते. अनेकदा चोर मोबाईल चोरल्यानंतर ताबडतोब तो स्विच ऑफ करतात, त्याचा पासवर्ड क्रॅक करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचे सुटे भाग करून बाजारात विकतात.
परंतु, आता घाबरण्याची किंवा हताश होण्याची अजिबात गरज नाही. भारत सरकारने मोबाईल चोरांना कायमचा धडा शिकवण्यासाठी आणि तुमचा मौल्यवान डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी यंत्रणा सुरू केली आहे. मोबाईल चोरीला गेल्यावर तुम्ही जर CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर जाऊन फक्त एक ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचे काम केले, तर चोर तुमचा फोन वापरणे तर दूरच, पण तो पोलिसांच्या भीतीने फेकून पळतील.
काय आहे ही सरकारी सिस्टीम?
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने (DoT) CEIR (http://www.ceir.gov.in) नावाचे एक अधिकृत वेब पोर्टल सुरू केले आहे. ही एक अशी मध्यवर्ती सिस्टिम आहे जी देशातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कशी जोडलेली आहे. जेव्हा तुम्ही या पोर्टलवर जाऊन तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवता, तेव्हा त्या फोनचा IMEI (International Mobile Equipment Identity) क्रमांक देशभरात ब्लॉक केला जातो. एकदा का IMEI ब्लॉक झाला की, त्या मोबाईलमध्ये भारतातील कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड (जसे की Jio, Airtel, Vi, BSNL) टाकले तरी त्यात नेटवर्क येत नाही. तो फोन साध्या डब्यासारखा किंवा विटेसारखा बनतो.
मोबाईल चोरीला गेल्यावर सर्वात आधी करा ‘हे’ काम
1. सिम कार्ड ब्लॉक करा आणि नवीन सिम घ्या
सर्वप्रथम तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला (उदा. जिओ किंवा एअरटेल) फोन करून तुमचे चोरीला गेलेले सिम कार्ड ब्लॉक करा. त्यानंतर त्याच नंबरचे एक नवीन सिम कार्ड (Duplicate Sim) काढून घ्या. कारण पुढील प्रक्रियेत OTP मिळवण्यासाठी हा नंबर आवश्यक असेल.
2. पोलिसात तक्रार नोंदवा
जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मोबाईल चोरीची तक्रार नोंदवा किंवा Online FIR दाखल करा. पोलिसांकडून मिळणारी FIR Copy आणि ‘तक्रार क्रमांक’ सांभाळून ठेवा.
3. CEIR पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करा
- आता कोणत्याही संगणकावर किंवा दुसऱ्या फोनवर http://www.ceir.gov.in ही वेबसाईट उघडा.
- तिथे होम पेजवर ‘Block Stolen/Lost Mobile’ या लाल रंगाच्या पर्यायावर क्लिक करा.
- एक अर्ज उघडेल, तिथे तुमचा मोबाईल नंबर, 15 अंकी IMEI नंबर (जो मोबाईलच्या बिलावर किंवा बॉक्सवर असतो), मोबाईलची कंपनी आणि मॉडेल निवडा.
- मोबाईल कुठे हरवला? किती तारखेला हरवला? ही माहिती भरा.
- तुमचा पोलीस तक्रार क्रमांक टाका आणि एफआयआरची डिजिटल कॉपी अपलोड करा.
- शेवटी मालकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड) अपलोड करा आणि नवीन सिम कार्डवर आलेला ओटीपी टाकून फॉर्म सबमिट करा.
‘नो सर्विस’ दाखवेल
तुम्ही तक्रार सबमिट करताच 24 तासांच्या आत तो मोबाईल भारताच्या दूरसंचार नेटवर्कवरून ब्लॉक केला जातो. चोर त्यात कोणतेही नवीन सिम कार्ड टाकेल, तेव्हा त्याला ‘नो सर्विस’ दाखवेल. तो फोनवरून साधा कॉल किंवा इंटरनेट वापरू शकणार नाही.
ट्रॅकिंग अलर्ट: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चोराने किंवा मोबाईल विकत घेणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीने त्यात सिम कार्ड टाकण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांच्या सिस्टीममध्ये तात्काळ ‘अलर्ट’ जातो. यामुळे पोलिसांना तो फोन कोणत्या भागात ऑन केला गेला आहे, याचे अचूक लोकेशन मिळते. पोलिसांच्या पकडले जाण्याच्या याच भीतीमुळे चोरटे तो फोन फेकून पळ काढतात.
फोन सापडल्यावर ‘अनब्लॉक’ कसे करायचे?
पोलिसांनी तुमचा फोन शोधून काढला किंवा तो तुम्हाला परत सापडला, तर काळजी करू नका. तुम्ही पुन्हा CEIR पोर्टलवर जाऊन ‘Unblock Found Mobile’ या पर्यायावर क्लिक करून, तुमचा रिक्वेस्ट आयडी आणि OTP टाकून फोन पुन्हा सुरू करू शकता.
थोडक्यात सांगायचे तर, मोबाईल चोरीला गेल्यावर कपाळावर हात मारून बसण्यापेक्षा सरकारच्या या ‘मास्टर की’चा वापर करा. यामुळे चोरांचे मनसुबे तर उधळले जातीलच, पण तुमचा वैयक्तिक डेटा आणि बँक खातीही सुरक्षित राहतील.

