Headlines

'मनोज जरांगेंची तळमळ कळतीये':मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, मेळाव्यात एकनाथ शिंदे काय म्हणाले?




परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी तिथे आलो तर एकनाथ शिंदे यांना माघारी फिरणे अवघड होईल, असा दम जरांगे यांनी दिला आहे. असे असून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणीत शेतकरी मेळाव्यासाठी दाखल झाले. यावेळी बोलताना शिंदे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलेच त्याचसोबत त्यांनी मनोज जरांगे यांचे कौतुक देखील केले आहे. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी तळमळ आम्हाला कळत असल्याचेही शिंदे म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ही जमवलेली गर्दी नाही. ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत. हे सगळे माझे लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा आणि लाडक्या बहिणी आणि लाडके शेतकरी आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसून आहात. तुमच्यासमोर दंडवत घातला पाहिजी. खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम आपण करत आहोत. परवा रक्षाबंधन झाले, हजारो लाडक्या बहिणी आल्या होत्या, आजही अनेक लाडक्या बहीणींनी राख्या बांधल्या. माझे सगळ्यात मोठे पद म्हणजे मी लाडक्या बहीणींचा लाडका भाऊ. मनोज जरांगे मराठा समाजासाठी लढत आहेत एकनाथ शिंदे म्हणाले, आज या ठिकाणी मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणावर आला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो हा बळीराजा पाला पोशिंदा आहे. अन्नदाता आहे. त्यामुळे कुठलेही राजकारण या शेतकऱ्यांच्या आड येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, मनोज जरांगे यांची देखील तीच अपेक्षा आहे. मनोज जरांगे यांची तळमळ माहीत आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या समाजासाठी लढत आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना दोन वेळा भेट दिली. आता देखील आमचे मंत्री त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजासाठीचा लढा हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अण्णा साहेब पाटील यांचे आंदोलन तुम्हाला माहीत असेल. मात्र मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सुरुवात कधी झाली असेल तर महायुतीचे सरकार 2014 साली आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही आरक्षण कमी न करता 12-13 टक्के आरक्षण देण्याचे काम केले होते. कोणाचेही काढून कोणाला देणार नाही पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उपोषण केले तेव्हा देखील त्यांची तळमळ आम्ही समजून घेतली. त्यांचे प्रयत्न मी पाहिले. जस्टिस शिंदे समिती आपण गठित केली, 10 टक्के आरक्षण लागू केले. कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू केले. सारथीला पैसे वाढवून दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला न्याय देण्याचे काम हे सरकार करत आहे. 2014 नंतर खरी सुरुवात झाली आहे. समाजाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे. कोणाचेही काढून कोणाला देणार नाही. समाजाची देखील तीच भूमिका आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला आपण आर्थिक मदत दिली, एसटीमध्ये नोकरी दिली आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री असताना मी अनेक योजना सुरू केल्या, आपल्या नावासमोर आईचे नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकरी आपला अन्नदाता, मायबाप आहे. बळीराजा संकटात असेल तर सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा असेल तर शेतकऱ्यांचा आहे, लाडक्या बहीणींचा आहे, लाडक्या युवकांचा आहे. आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्याने धरली बाळासाहेबांच्या विचारांची कास त्याचे नाव बंडू बॉस एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी संकटात आहे. 20-25 दिवस झाले पाऊस नाही. मी आपल्याला सांगतो, तुमच्या संकटात पाठीशी उभे राहिल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. आज बळीराजा, आपला मायबाप आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एकच सांगेल, या ज्या काही योजना आहेत, त्या आपण पुढे नेत आहोत. आपले खासदार बंडू जाधव शिवसेनेत आले. 2022 साली उठाव झाला आणि त्यानंतर पुन्हा 6 खासदारांनी उठाव केला. हे 6 वाघ खऱ्या शिवसेनेत आले आहेत. संजय बंडू जाधव खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर त्यांनी आपल्यासाठी अनेक वर्ष काम केले आहे. माणूस खास, विकासाचा ध्यास, असली शिवसेने में आया आपणा बंडू बॉस. ज्याने धरली बाळासाहेबांच्या विचारांची कास त्याचे नाव आहे बंडू बॉस. ..आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एकनाथ बंडू जाधव तुम्ही तुम्ही चिंता करू नका, दोन संजय इथे आहेत. पण बंडू बॉस चिंता करू नका, परभणीकरांची तुम्हाला आहे साथ आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एकनाथ, असे शिंदे यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, विकासासाठी या परभणीकरांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी या 6 लोकांनी निर्णय घेतला आहे. आज इथे 110 कोटींचा निधी उभा केला आहे. यापुढे मी सांगतो, त्यांनी पाण्याचा विषय काढला, जे काही शेतकऱ्यांसाठी करता येईल, परभणीकरांसाठी करता येईल ते महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी दिला. खासदारांचा उठाव स्वार्थासाठी नाही बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, त्यासाठी मी एकच सांगतो, या खासदारांचा उठाव स्वार्थासाठी नाही. परभणीकरांसाठी आहे. जनतेसाठी आहे. आणि म्हणून ते खऱ्या शिवसेनेत आले आहेत. या खासदारांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली, गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला आहे. हे सरकार तुमचे आहे. हे डबल इंजिनच्या सरकारसोबत राहून विकास कामांना गती दिल्याशिवाय राहणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत