![]()
भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या आणि अवकाश संशोधन व तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी सावनकुमार म्हणाले की, इस्रो ही उपग्रह व अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था आहे. आधुनिक युगात उपग्रह तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनातील अनेक सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत. इस्रोला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यपद्धती, संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञान जवळून पाहण्याची ही मोठी संधी आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक ज्ञानात भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दौरा पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक दौऱ्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून गुणवंत विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ४ शिक्षक व कर्मचारी तसेच एका तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेला विशेष चमू विद्यार्थ्यांसोबत रवाना झाला आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध वैज्ञानिक उपक्रमांची, अवकाश तंत्रज्ञानाची, उपग्रह निर्मितीची प्रक्रिया तसेच संशोधन आणि विकास कार्याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेता येणार आहे. हा अनुभव विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाबद्दल सखोल ज्ञान देईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांनी केले. यावेळी महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा चांदेवार, उपशिक्षणाधिकारी राहुल बावा आणि जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्याचा अधिकाधिक लाभ घेऊन स्वतःमध्ये चौकस आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
Source link
भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना:जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्याकडून शुभेच्छा; वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे आवाहन
