Headlines

बांधकामांचा सपाटा सुरूच, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये बांधकामांचे इमले; अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर| Maharashtra Times


शिळफाट्यात कारवाईचा बडगा उगारला जात असताना कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईतील दुहेरी निकषांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

बांधकामांचा सपाटा सुरूच (गणेश जाधव)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे: दाटीवाटीने उभारलेली बांधकामे… चिंचोळ्या गल्ल्या… अग्निसुरक्षेच्या नियमांना फासलेला हरताळ अशा प्रकारे मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात दररोज बांधकामे उभारण्याचा सपाटा कायम आहे. एकीकडे ठाणे महापालिका प्रशासनाकडून शिळफाट्यातील अडीचशेहून अधिक अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात आलेली असताना ‘कोठारी’ मधील अनियमितपणे उभारल्या जाणाऱ्या बांधकामांना थेट अभय देण्यात येत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी नुकताच पालिकेच्या महासभेत केला होता. तरीही नियमावली धाब्यावर बसवत या भागात बिनदिक्कतपणे बांधकामे सुरूच आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पालिका प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठाण्यातील मानपाडा परिसरात २७, ७ आणि ५ एकर अशा विस्तीर्ण भागात कोठारी कंपाउंड अस्तित्वात आहे. पूर्वी गोदाम व लघु उद्योग असणाऱ्या या भागात १० ते १५ वर्षांपूर्वी फर्निचर मार्केट आणि त्याच्या माल साठवणुकीची गोदामे टप्प्याटप्प्याने उभी राहिली. त्यानंतर हॉटेल, लाउंज, पब, हुक्का पार्लरचे पेव या भागात फुटले. तसेच वाहनांचे सर्व्हिस सेंटर, वॉशिंग सेंटर, मार्बल व टाइल्स गोदाम, बार, लॉजिंग व्यवसाय या भागात अनिर्बंधपणे फोफावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या येथील पब, लाउंज व हुक्का पार्लरचा मुद्दा अनेकदा विधिमंडळ अधिवेशनात गाजला. स्थानिकांना येथील गोंधळाचा त्रास होत असूनही प्रशासन कारवाईत बोटचेपे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप ठाणे पालिकेच्या महासभेत प्रभारी विरोधी पक्षनेत्या मार्जिया पठाण यांनी केला होता.

तसेच शिळफाटा येथे गोदामांवर कारवाई करताना विशिष्ट वर्गाला लक्ष्य केले जात असून शहरातील इतर भागात अशा पद्धतीने कारवाई का होत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी शहरामधील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी सूचित केले होते.

दुर्घटनांवर दृष्टिक्षेप

सन २०१७ मध्ये येथील फरसाण कंपनीला आग लागली होती. यामध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. याआधी येथील एका सर्व्हिस सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १७ वाहने जळून खाक झाल्याचा प्रकार घडला होता. या सर्व्हिस सेंटरला लागून असलेले लाकडी फर्निचर गोदामही आगीच्या विळख्यात सापडल्याने येथील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुर्देवाची बाब म्हणजे, या आगीत गोदामांचे रक्षण करण्यासाठी बांधून ठेवलेल्या दोन पाळीव श्वानांचा अंत झाला होता.

स्थानिक प्रशासन अनभिज्ञ

या भागात होणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथील लाउंज बार, हुक्का पार्लर आणि हॉटेलच्या बांधकामांदरम्यान अग्निशमन विभागाची नियमावली धाब्यावर बसवण्यात येते. तरुणाईला बिघडवणारे हे सर्व धंदे सुरू असून पालिकेला हे प्रकार दिसत नाहीत का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस, शप पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा