Headlines

फेरचौकशी कागदावरच! चेंबूर दुर्घटनेप्रकरणी महापौरांच्या आदेशाला मुंबई महापालिकेचा हरताळ| Maharashtra Times


Vihaan Srivastava: चेंबूरमध्ये झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा करूण अंत झाल्याच्या घटनेच्या फेरचौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देऊन जवळपास दोन आठवडे उलटले तरी, बीएमसीने या घटनेची चौकशी करणाऱ्या स्वतंत्र समितीची अद्याप नियुक्तीही केलेली नाही.

चेंबूर दुर्घटना फेरचौकशी
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशाला मुंबई महापालिकेने हरताळ फासला आहे. फेरचौकशीसाठी महापालिकेने कोणत्याही प्रकारची त्रयस्थ संस्था नियुक्त केलेली नाही. महापालिकेच्या या चालढकलीवर शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबत महापालिका वेळकाढूपणा करत असल्याची टीका केली आहे.

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ ३० जून २०२६ रोजी शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर १६ जुलैला महापालिका सभागृहात सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून चर्चा घडवून आणली.

Maharashtra TimesMahim Accident : अपघाताचा आवाज ऐकून पती घराबाहेर, पत्नीला बाईकने फरफटत नेलेलं, अक्कलकोटला निघण्यापूर्वी माहिमच्या कुटुंबावर शोककळा

१२ दिवसांपूर्वी फेरचोकशीचे आदेश

चेंबूरमधील घटनेनंतर महापालिकेने दोन सदस्य समिती नेमली व यावर महापालिकेचे दोन अधिकारी नियुक्त केले. आम्ही त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे यावेळी सभागृहात गणेश खणकर यांनी म्हटले होते. तर महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी, चेंबूरमधील दुर्घटनेतील झाड हे ६० ते ७० वर्ष जुने होते आणि आतून पूर्णपणे पोकळ झाले होते, तर काँक्रीटीकरणासारखे एक कारण नसून, अनेक कारणे असल्याचे त्यावेळी सभागृहात स्पष्ट केले होते. मात्र, हा अहवाल मान्य नसल्याचे सांगत महापौरांनी पुन्हा चौकशी करून सविस्तर अहवाल सभागृहात सादर करण्यास सांगितले. याला १२ दिवस उलटूनही महापालिकेकडून हालचाली झालेल्या नाहीत. सभागृहात झालेल्या या चर्चेचे इतिवृत्त १६ जुलैलाच महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आलेले आहे. तरीही महापालिकेकडून याची चौकशीची सुरुवातही झालेली नाही किंवा त्रयस्थ संस्थाही नियुक्त केलेली नाही. यासंदर्भात आपल्याकडे काहीच माहिती नाही, असे महापालिका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चेंबूर दुर्घटनेप्रकरणी पहिल्या चौकशी अहवालाचे महापालिकेत तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणी कंत्राटदार आणि सल्लागारावर किरकोळ दंडात्मक कारवाईची शिफारस करण्यात आल्याने महापौरांनी हा अहवाल फेटाळला.

Maharashtra TimesMumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार

महापालिके चालढकल करत असल्याची टीका

महापालिका सभागृहात चेंबूर घटनेवरून झालेल्या चर्चेवेळी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी महापालिकेवर टीका केली होती. विहान श्रीवास्तव हा त्यांच्या मैत्रिणीचाच मुलगा आहे. अद्यापही फेरचौकशी कागदावरच असल्याने यासंदर्भात समृद्धी काते यांना विचारले असता, या घटनेची पुन्हा चौकशी करण्यास मुंबई महापालिका चालढकल करत असल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापौरांनी सभागृहात निर्देश देऊनही याची काहीच माहिती समोर आलेली नाही. या घटनेला अधिकारी कारणीभूत असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. विहान श्रीवास्तवचे आईवडील लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे काते यांनी सांगितले.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा