खडकलाट येथील घटना : फेब्रुवारीमध्ये केलेल्या कृत्याचा उलगडा
त. भा. वार्ताहर
खडकलाट : संपूर्ण देशात विम्याची रक्कम हडपण्यासाठी, प्रॉपर्टीसाठी व प्रेमापोटी पतीचा खून करून अडसर दूर करण्याच्या घटना घडत आहेत. आज सात जन्मासाठी हाच पती मिळू दे म्हणून एकीकडे महिला वटसावित्रीचे पूजन करत असताना दुसरीकडे प्रेमापोटी अडसर ठरत असलेल्या पतीला ठार मारून स्वत:हून त्याला आपल्या शेतात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशीच घटना खडकलाट ता. चिकोडी येथे गुरुवारी उघडकीस आली आहे. सदर खून फेब्रुवारी 2026 मध्ये घडला असून राघू सिद्धाप्पा गावडे (वय 38) असे दुर्दैवी पतीचे नाव आहे.
वडर कोरवी गल्लीजवळ राघू सिद्धाप्पा गावडे हा आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होता. राघूला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेमध्ये तो वारंवार घरातून बाहेर जात होता. याच काळात राघूची पत्नी भंगारी राघू गावडे (वय 32) हिचे बेनाडी येथील राघूचा मावस भाऊ रामा मायाप्पा रानगे (वय 40) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे राघू घरात नसताना रामा राणगे वारंवार घरी येत असे. यातून त्यांचा सहवास वाढत गेला.
पण ज्यावेळी राघू घरात असे त्यावेळी रामा घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे होत असत. त्यामुळे राघू हा आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे रामा व भंगारी यांना त्रास होत असे. त्यामुळे आपल्या प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी फेब्रुवारी 2026 या महिन्यात रात्रीच्यावेळी भंगारी व रामा दोघेही मिळून राघूला जास्त दारू पाजून दारूच्या नशेमध्ये गाडीवर बसून आपल्या शेतात घेऊन गेले. त्यांचे स्वत:च्या मालकीचे शेत खडकलाट-अकोळ मार्गावरील घाटगे मळ्याजवळ आहे. त्या ठिकाणी घेऊन जाऊन गळा आवळून राघूचा खून करण्यात आला. रामा व भंगारी या दोघांनी मिळून आपल्या शेतातच ख•s खोदून राघूला दफन केले. घरी परत येऊन काही घडलेच नाही असा बनावही निर्माण केला.
फेब्रुवारी 2026 मध्येच भंगारी हिने खडकलाट पोलीस स्थानकात आपला पती बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यावेळी पतीला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार असेच घर सोडून जात असे, असे सांगितल्यानंतर घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली नाही. पण स्वत: भंगारी हिने आपल्या पतीला मारून दफन करून पोलीस स्थानकात येऊन आपला पती हरवल्याची नोंद केली. याकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले. राघू गावडे यांच्या नातेवाईकांना 6 महिन्यांपासून राघू गावात नाही याची माहिती मिळाली. समाजातील कोणत्याही शुभकार्यात राघू नसल्याची जाणीव नातेवाईकांना झाल्यानंतर नातेवाईकांनी भंगारी हिला राघूबद्दल विचारणा केली.
7 रोजी सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ कृष्णगौडर, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, खडकलाट पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर यांनी राघू गावडे याला दफन केलेल्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली. अधिक माहितीसाठी भंगारी राघू गावडे व रामा मायप्पा रानगे या दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक तपास करत आहेत. मयत राघू याच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद मयत राघू याचे मोठे बंधू लगमन्ना गावडे यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
